दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
सरसंघचालक भागवत यांचे नथीतून तीर मारणे सुरूच…
महायुती सरकारमध्ये असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील ( अजित पवार ) अनेक नेत्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी एकामागोमाग उजागर होत असल्यामुळे भाजपची मातृसंघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने चांगलीच आगपाखड केली आहे.
पक्षाचे धनंजय मुंडे हे अडचणीत आले असताना त्यांचे कृषीमंत्री असलेले माणिकराव कोकाटे हे देखील आता जेलची हवा खाण्याच्या तयारीत आहेत.अजित पवार गटात स्वतः अजित पवार,धनंजय मुंडे,माणिकराव कोकाटे,हसन मुश्रीफ,या चार वरिष्ठ मंत्र्यासह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे,माजी मंत्री छगन भुजबळ,नबाब मलिक व खा.प्रफुल्ल पटेल,असे एकूण आठ जण भ्रष्टाचार प्रकरणी वादग्रस्त ठरले आहेत.या लोकांमुळे आपल्या पक्षाच्या प्रतिमेला तडा गेल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे.
दोन दिवसापूर्वी शिवजयंतीच्या दिवशी संघाच्या दिल्लीतील मुख्यालयाचे उदघाट्न करताना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केलेल्या भाषणात संघकार्यांची दिशा चुकू देऊ नका,असा इशारा दिला.एकेकाळी आपल्या कार्याला प्रतिकूलता होती, पण त्यावेळी आपण योग्य दिशेने काम करत राहिलो. आता आपल्या कार्याला अनुकूलता प्राप्त झाली असताना आपली दिशा चुकता कामा नये,त्यासाठी दक्षता घेण्याची गरज आहे.त्यांच्या या इशाऱ्यातून भाजपने अजित पवार गटाला महायुतीमध्ये सामील करून घेतले,त्याचे दुष्परिणाम आता दिसून यायला लागले आहेत.असा सुर त्यांच्या या भाषणातून ऐकायला मिळाला.शिंदे गटाची आमदार संख्या पुरेशी असताना ” पवार संस्कारीत,” अजित पवार यांच्या चेलाचपाट्ट्याना जवळ करण्याची काही गरज नव्हती, असेच त्यांना सुचवायचे होते. त्यांच्या या भाषणाची क्लिप सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर आता राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. यापूर्वीही संघांचे मुखपत्र असलेल्या ” ऑबझरर्व्हर,” या मासिकाने अजित पवार गटाला महायुतीमध्ये सामावून घेण्याच्या निर्णयावर सडकून टीका केली होती.

