दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
ज्या अधिकाऱ्यांना प्रमाणिकपणे काम करायचे नाही,त्यांनी स्वयंखुशीने निघून जावे – पालकमंत्री नाईक,
काल पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा मुख्यालयात जनता दरबार आयोजित करण्यात आला होता.
अपेक्षेनुसार या जनता दरबाराला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या दरबारात सुमारे साडेसातशे निवेदने दाखल झाली.त्यापैकी ३५ ते ४० निवेदने निकाली काढण्यात आली.आलेल्या एकूण तक्रारीपैकी ५ % प्रकरणाचा निपटारा करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.उर्वरित तक्रार अर्जावर संबंधित विभागाकडून खुलासा मागवण्यात येणार आहे.संबंधित विभागाकडून खुलासे आल्यानंतर त्यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी स्पष्ट केले.पण या जनता दरबारामध्ये नाईक यांनी प्रशासकीय व लोकांच्या समस्या/ अडचणी सोडवण्यासंदर्भात अधिकाऱ्याकडून होणारी दिरंगाई व वेळकाढुपणा यावर नेमके बोट ठेवले व अधिकाऱ्यांना सज्जड दम दिला.हा सज्जड दम ” मी मारल्यासारखे करतो,तू रडल्यासारखे कर, ” अशा पठडीतला नसावा,असे आपण धरून चालूया.पण अधिकारीवर्ग लोकांच्या अडचणी व समस्या सोडवण्याच्या कामात किती अडथळे आणतात,त्यांना किती चपला घासायला लावतात,हे दस्तूरखुद्द पालकमंत्र्यांना या निमित्ताने अनुभवायला मिळाले. पालकमंत्री नाईक उद्दिग्न होऊन काय म्हणाले ते पहा,ते म्हणाले,” अधिकाऱ्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून योग्य ती कारवाई करावी, ठोकळेबाज व परिपाठाप्रमाणे उत्तरे देऊ नये.जर प्रामाणिकपणे काम करायचे नसेल तर त्यांनी स्वयंखुशीने आपली बदली इतर जिल्ह्यात करून घ्यावी, ” या घटनेवरून आपल्या जिल्ह्याची प्रशासकीय यंत्रणा कशी काम करते,हे अधोरेखित झाले. आज पालघर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती हाताबाहेर गेली आहे. दिवसागाणिक गुन्ह्यामध्ये वाढ होत आहे,अमलीपदार्थ विक्रीचा व्यवसाय सतत फोफावत चालला आहे. आजच्या घडीला जिल्ह्यात लाखो अनधिकृत बांधकामे उभारण्यात आली आहेत. शासकीय अधिकाऱ्यांचे या अनधिकृत बांधकामे करणाऱ्याकडून खंडणी वसुली करण्याचे वेगाने सुरु आहे. शासकीय,आदिवासी व वनजमिनी लुटल्या जात आहेत.गोरगरीब लोकांचे संसार रस्त्यावर आले आहेत. पण अधिकारी व राजकीय नेते आपल्या तुंबड्या भरण्यात मशगुल आहेत.अशावेळी पालकमंत्र्यांनी जिल्हावासियांना एक आशेचा किरण दाखवला आहे.तो सवंग लोकप्रियतेचा भाग होता कामा नये.कारण यापूर्वी झालेल्या अनेक जनता दरबारे ही लोकांचा भ्रमनिरास करणारी ठरली होती.

