दीपक मोहिते,
नवनिर्वाचित निवडणूक आयुक्तांकडून मतदारांना फार मोठ्या अपेक्षा,
भारताचे २६ वे मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त पदी नव्याने नियुक्त झालेले हे १९८८ च्या बॅचचे केरळ केडरचे अधिकारी आहेत.राज्य व केंद्रीय स्तरावर त्यांनी अनेक पदावर काम केले असून केंद्रीय गृहमंत्रालयात काम करताना त्यांनी अनेक महत्वाच्या विषयी त्यांनी प्रभावी भूमिका पार पाडली होती.३७० कलम रद्द केल्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये ज्ञानेश कुमार यांचे फार मोठे योगदान होते.त्यांची प्रशासकीय वाटचाल लक्षात घेऊन केंद्र सरकारने त्यांची राममंदिर ट्रस्टच्या सदस्यपदी निवड केली होती.असे हे ज्ञानेशकुमार,यांनी तत्कालीन निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांच्याकडून नुकतीच सूत्रे हाती घेतली.
आपल्या देशाचा केंद्रीय निवडणूक आयोग हा गेल्या दहा वर्षात एक चेष्टेचा विषय बनला आहे.संविधानातील तरतुदीनुसार आयोगाने गेल्या सात दशकात कधीही कारभार केला नाही.माजी आयुक्त टी.एन.शेषन वगळता प्रत्येक निवडणूक आयुक्तांनी सरकारच्या ताटाखालचे मांजर म्हणून वागण्यात धन्यता मानली. काँग्रेसच्या राजवटीत तशीच परिस्थिती होती,आणि आता एनडीए च्या राजवटीतही तशीच तऱ्हा पाहायला मिळते.माजी आयुक्त राजीव कुमार यांनी तर कंबरेचे सोडून डोक्याला गुंडाळले होते.त्यांनी आपल्या कार्यकाळात घेतलेले अनेक निर्णय वादग्रस्त ठरले.त्यांनी निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाचा तो बटीक बनवला होता.माजी आयुक्त टी.एन.शेषन यांनी आपल्या कार्यकाळात आयोगाची स्वायत्तता अबाधित राखली होती.मात्र त्यांच्यानंतर आलेल्या प्रत्येक आयुक्ताने आयोगाची प्रतिष्ठा धुळीला मिळवली.आयुक्त राजीव कुमार यांची कामगिरी अत्यंत संशयास्पद अशी होती,त्यामुळे ती भारतीय मतदारांच्या कायम स्मरणात राहणार आहे.त्यांच्या काळात झालेल्या देशातील सर्व निवडणुकांचे वेळापत्रक हे केंद्र सरकारच्या मर्जीनुसार तयार करण्यात येत असे.तसेच निवडणुकीतील तक्रारी,निकालातील गैरप्रकार व गोंधळ याविषयी विरोधी पक्षाकडून घेण्यात आलेल्या आक्षेपांना ते थेट केराची टोपली दाखवण्यात धन्यता मानत असत.सध्या आपली लोकशाही बिकट अवस्थेतून जात असताना, असे सरकारच्या आहारी जाणारे निवडणूक आयुक्त आपल्याला परवडणारे नाहीत.त्यामुळे नवनिर्वाचित मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांना आपला कारभार निष्पक्ष,स्वतंत्र व पारदर्शक,अशा तीन मुल्यावर आधारीत करावा लागणार आहे.ज्ञानेशकुमार यांच्याकडून भारतीय मतदारांच्या फार मोठ्या अपेक्षा आहेत.त्यांच्या अपेक्षांना ज्ञानेशकुमार हे खरे उतरतात का ? हे येणाऱ्या काळात पाहायला मिळणार आहे.

