दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
भाजपचा डोळा,आता जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेण्यावर
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका या स्वबळावर लढण्याची मागणी,भाजपचे खासदार,आमदार,पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.त्यादृष्टीने पक्षाचे वरिष्ठ नेतेही अनुकूल असल्याचे संकेत मिळत आहे.पण प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आम्ही या निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढणार असल्याचे प्रसिद्धीमाध्यमाना सांगितले.पण त्यांच्या या वक्तव्याला कोणी फारसे गांभीर्याने घेतले नाही.कारण पक्षातील सर्व घटकाचा कल हा आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याकडे आहे.
महायुतीच्या घटक पक्षांनी एकमेकांशी समझौता करून निवडणुका लढवल्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांना योग्य प्रमाणात तिकिटे देता येणार नाही,हे लक्षात घेऊन भाजपचे वरिष्ठ नेते पक्षातून होणाऱ्या स्वबळाच्या मागणीचा विचार करतील,अशी शक्यता आहे.
पालघर जिल्ह्यात विशेष करून वसई तालुक्यात शिंदे व पवार गटाची ताकद अगदी नगण्य आहे.लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर त्यांच्या पक्षाकडे तरुणाईचा वाढत चालला आहे.त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीत इच्छुकांची गर्दी होण्याची शक्यता आहे.महायुती जर ही निवडणूक एकत्रितपणे लढली तर नाराज पदाधिकारी व कार्यकर्ते हे एकमेकांना मदत करणार नाहीत,अशा निर्णयाप्रत वरिष्ठ नेते आले आहेत.या निवडणुकीसाठी शिंदे गट ताकद नसतानाही अधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्नशील राहील.अजित पवार गटाकडून मात्र ही निवडणूक लढवण्याची शक्यता फार कमी आहे.कारण त्यांच्या पक्षाची या जिल्ह्यात बांधणीच झालेली नाही.पालघर नगरपरिषद ही गेली तीन वर्षे जिल्हा परिषद व पालघर नगरपरिषद शिंदे गटाच्या ताब्यात होती,पण त्यांच्याकडून अपेक्षित विकासकामे झाली नाहीत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने गावित व तरे या दोघांना शिंदे गटातून तिकीट मिळवून दिले व ते निवडूनही आले.त्यामुळे जिल्ह्यावर भाजपचे आता निर्विवाद वर्चस्व निर्माण झाले आहे. पालघर जिल्हा परिषद व पालघर नगरपरिषद आपल्या ताब्यात यावी,यासाठी भाजप येथेही जास्तीत जास्त जागा स्वतःकडे खेचून घेईल किंवा स्वबळाचा नारा देईल.डहाणू,जव्हार नगरपरिषदा,विक्रमगड,
तलासरी,वाडा व मोखाडा या नगरपंचायतीवरही भाजपचा डोळा असून शिंदे गटाला ते या निवडणुकीत फारशा जागा मिळू देणार नाहीत.

