दीपक मोहिते,
माझा गांव कुठे हरवला ?
भाग क्र. १,
आपला देश हा सुमारे सहा खेड्यामध्ये पसरलेला आहे.देशाचा पूर्व इतिहास लक्षात घेता खेडं हाच आपल्या देशाचा आत्मा आहे.पण गेल्या सात दशकात खेड्यातील आर्थिक व सामाजिक व्यवस्थेला तडा गेल्याचे दिसून आले आहे.गेल्या काही वर्षात खेड्यातून शहराकडे होणाऱ्या स्थलांतरणाचे प्रमाण प्रचंड वाढत गेले व खेडी ओस पडत गेली.या सात दशकाच्या काळात शासनकर्त्यांनी खेड्यातील हरवलेले चैतन्य परत निर्माण करण्याचा प्रयत्नच केला नाही.त्यांचे धोरण हे केवळ शहरी भागापूरतेच मर्यादित राहीले,त्यामुळे खेडी ही विकासापासून कायम वंचित राहीली. स्वातंत्र्यानंतर आखण्यात आलेले धोरण व प्रत्यक्षात निर्माण केलेली व्यवस्था,यामध्ये प्रचंड तफावत राहिल्यामुळे खेडी बाळसं धरू शकली नाहीत.
पुरातन काळात गावाची जी व्याख्या करण्यात आली,त्या परिसरात शेतीसाठी योग्य जमीन आहे,पुरेसे मनुष्यबळ व इतर आवश्यक ती संसाधने उपलब्ध आहेत,त्या परिसराला गाव म्हंटले जात असे.
आज आपले हे गाव,न जाणो कुठे हरवले आहे ? गावखेड्यातील स्थानिक मनुष्यबळ सतत घटत चालले आहे.मानवजात बदलत गेला तरी भूगोल व निसर्ग अजूनही आपल्या जागी टिकून आहे.पण गेल्या काही वर्षात गावखेड्याचे गावपण ओरबाडून खाण्यास सुरुवात झाली आहे.गावखेड्याचा विकास हा विनाशकारी प्रकल्पाच्या माध्यमातूनच होत असतो,असा अविचार करणारी नवीन पिढी उदयाला आली आहे.त्यांचे विनाशाला आमंत्रण देणारे हे धोरण आता खेड्याच्या जीवावर उठू लागले आहे.पूर्वी रोजगाराच्या शोधात स्थानिक भूमीपुत्र शहरी भागाकडे धाव घेत असत,आता मात्र बाहेरच्या लोकांचे आवागमन या प्रकल्पामध्ये रोजगार मिळवण्यासाठी मोठ्याप्रमाणात वाढत चालले आहे.या प्रक्रियेला आलेला प्रचंड वेग पाहता एकेकाळी बहुसंख्यांक असलेला स्थानिक भूमिपुत्र आता अल्पसंख्यांक होण्याच्या मार्गावर आहे.हे जे धोरण सरकारने आखले आहे,त्यासाठी जी व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे,ती गांधीजीनी पाहिलेल्या ” समृद्ध खेडी,” या संकल्पनेला छेद देणारी आहे.” समृद्ध खेडी,” या कल्पनेमागे एक समाजहिताचा प्रगल्भ विचार होता,पण राज्यकर्त्यांच्या हव्यासापोटी तो तडीला जाऊ शकला नाही.देशातील सहा लाख खेड्याना आर्थिक व सामाजिकदृष्ट्या समृद्ध करायचे,असेल तर आपली मानसिकता ही सकारात्मकच हवी.अन्यथा सर्वांगीण विकासाच्या प्रतिक्षेत असलेली ही खेडी कायम उपेक्षितच राहतील.
क्रमशः

