दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
आउटगोइंगला प्रचंड वेग : आम्हाला काही फरक पडत नाही,उद्धव ठाकरे यांचा हा हट्टीपणा पक्षाला मारक ठरणार,
शिवसेनेची ( उबाठा ) मुलुखमैदानी तोफ अशी ओळख असलेले चिपळूणचे आ.भास्कर जाधव यांनी पक्षाच्या सद्यस्थितीवर केलेल्या भाष्यामुळे सर्वांच्या भुवया वर गेल्या आहेत.उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी माजी खा.विनायक राऊत यांनी ” आ.भास्कर जाधव हे आमचे नेते आहेत,ते जर नाराज असतील तर त्यानी पक्षप्रमुखाशी बोलायला हवे,” अशी प्रतिक्रिया दिली आहे.आ.भास्कर जाधव हे लढवय्ये नेते म्हणून ओळखले जातात.कोकणात राणे कुटुंबियांशी सरळ दोन हात करण्यात ते कायम आघाडीवर राहीले.पण अनेक संकटप्रसंगी त्यांना पक्षाकडून कधीच मदत मिळाली नाही.यापूर्वी देखील अशाच वागणुकीमुळे सेनेला सोडचिठ्ठी देऊन त्यांनी राष्ट्रवादीचा रस्ता धरला होता.पण तेथेही त्यांची घुसमट झाल्यामुळे ते कालांतराने स्वगृही परतले.पण त्यांच्या हाती फारसे काही लागले नाही.विधानसभा सभागृहात ते बोलायला उभे राहिले की सभागृह दणाणून सोडत असत.अभ्यासपूर्ण भाषण व सत्ताधारी पक्षाच्या वर्मावर बोट ठेवून हल्ले चढवणे,हा त्यांचा स्थायी स्वभाव.या अशा त्यांच्या आक्रमक स्वभावामुळे सत्ताधारी पक्षाचे नेते त्यांना वचकून असतात.पण सध्या पक्षाची दयनीय अवस्था पाहून विचलित झाले आहेत.त्यामुळे दोन दिवसापूर्वी पक्षाची अवस्था ही विझलेल्या निखाऱ्यावर साचत असलेल्या राखेसारखी झाली असून आता विचार करण्याची वेळ आली आहे,अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
त्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अद्याप रिऍक्ट झाले नसले तरी माजी खा.राऊत यांनी जाधव यांना पक्षप्रमुखाशी बोलण्याचा सल्ला दिला आहे.वास्तविक जाधव यांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.कारण ज्या वेगाने पक्षात आउटगोइंग सुरू झाले आहे,ते लक्षात घेता येणाऱ्या काही काळात पक्ष रिकामा होण्याची शक्यता आहे.पण उद्धव ठाकरे व त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे,हे आउटगोइंग रोखण्याचे प्रयत्न करण्याऐवजी ज्यांना जायचे आहे,त्यांना जाऊ द्या,आम्हाला काही फरक पडत नाही.असे आडमुठे धोरण कवटाळून बसले आहेत.त्यांचा हा हट्टीपणा पक्षाला विनाशाकडे नेणारा आहे.

