दीपक मोहिते,
” बॉटमलाईन,”
जनता दरबारला लोकांचा किती प्रतिसाद मिळेल,हे सांगणे कठीणच आहे….
माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारकिर्दीत ” सरकार आपल्या दारी,” या उपक्रमाचा चांगलाच सुळसुळाट झाला होता.कोट्यवधी रु.ची उधळपट्टी करत,असे अनेक इन्व्हेंट पार पडले.पण सरकार दरबारी दाखल झालेल्या लाखो तक्रारींपैकी किती तक्रारीचा निपटारा होऊ शकला,हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे.
आता देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने शिंदे यांच्या ” शासन आपल्या दारी,” च्या धर्तीवर ” जनता दरबार,” आयोजित करण्यास सुरुवात केली आहे.या दोन्ही उपक्रमाला गोरगरीब जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत असतो,पण कालंतराने आपली फसवणूक झाल्याचे त्यांना कळते,पण बिचारे काही करू शकत नाहीत.मंत्र्यांची भेट सहजासहजी मिळणे कठीण असते,त्यामुळे ते अशा उपक्रमाकडे धाव घेत असतात.दीड वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालघर येथे प्रचंड गाजावाजा करत ” शासन आपल्या दारी,” या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.लाखो रु.खर्च करून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास हजारो आदिवासीनी पदरमोड करून हजेरी लावली होती.जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आदिवासी तीन ते चार तास पायपीट करून या कार्यक्रमासाठी पालघर येथे आले होते.पण त्यांच्या पदरी घोर निराशा पडली.आजही ते जिल्हाधिकारी कार्यालयात आमच्या तक्रारीचे काय झाले ? विचारण्यासाठी आपल्या चपला झिजवत आहेत.त्यामुळे सरकारच्या अशा उपक्रमावरून लोकांचा विश्वास उडत चालला आहे.
आता नव्याने सुरु होत असलेल्या जनता दरबाराचेही तेच होणार,अशी चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे.या अशा इव्हेंटमध्ये मंत्रीमहोदय,हे तक्रार अर्जावर ” कार्यवाही करण्यात यावी,” असे शेरे मारत असतात व त्यानंतर तो अर्ज संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सरकवला जातो.त्यानंतर मात्र त्या अर्जाचे काय होते,त्याचा थांगपत्ता लागत नाही.” आमच्या तक्रारीचे काय झाले ? ” अशी विचारणा करणारा तक्रारदार अधिकाऱ्यांच्या सततच्या टोलवाटोलवीमुळे पार मेटाकुटीला येतो व नाद सोडून देतो.अशा या ” बनवाबनवी, ” च्या जीवघेण्या खेळामुळे नव्याने सुरु होणाऱ्या या जनता दरबाराला लोकांचा किती प्रतिसाद मिळेल,हे सांगणे जरा कठीणच आहे.

