दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
ईडी ; छातीत धडकी भरवणारी तपास यंत्रणा, ( भाग क्र.१ )
गेल्या काही वर्षात सक्त वसुली संचालनालय ( ईडी ),केंद्रीय गुन्हे अन्वेषण ( सीबीआय ) व
आयकर विभाग ( आयटी ) या तीन केंद्रीय तपास यंत्रणांची दहशत आपल्याला
पाहायला मिळाली.ईडीच्या भितीने तर अनेक राजकीय नेत्यांचे धाबेच दणाणले,अटक टाळण्यासाठी अनेक नेत्यांनी अक्षरशः लोटांगण घालत सत्ताधारी पक्षाला समर्थन दिले.अनेकांच्या छातीत धडकी भरवणारा हा पीएमएलए कायदा नेमका काय आहे ? इतकी वर्षे ईडी हा विभाग कार्यरत असताना गेल्या बारा वर्षात तो इतका सक्रिय होण्यामागची नेमकी काय कारणे आहेत,यावर आपण आज प्रकाशझोत टाकणार आहोत.
चला,तर सर्वप्रथम ईडी हा विभाग कधी अस्तित्वात आला,तो स्थापन करण्यामागे तत्कालीन सरकारचा काय उद्देश होता ? याविषयीची माहिती घेऊया..
सरकारी कामकाज व राजकारणातील आर्थिक गैरव्यवहार रोखण्याचे काम ईडी करत असते.१ मे १९५६ रोजी तिची स्थापना करण्यात आली होती.या विभागाची ओळख ही देशात आर्थिक कायद्याची अंमलबजावणी व आर्थिक गुन्ह्याचा बंदोबस्त करणारी यंत्रणा अशी आहे.या विभागाचा मुख्य उद्देश केंद्र सरकारच्या वरील दोन कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे असते.मात्र हा विभाग १९५६ ते २०१४ तब्बल ५८ वर्षे फारसा नावारूपाला येऊ शकला नाही.या प्रदीर्घ काळात त्यांनी काही आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आणले,आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्या मूठभर उद्योजकांना त्याचा दणका बसला.पण त्यावेळी ईडी काय आहे ? तीचे कामकाज कसे चालते,याविषयी सर्वसामान्य लोकांना कोणतीच माहिती नव्हती.२०१४ साली केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आले व त्यांच्या सरकारने विरोधकांना नामोहरम करण्यासाठी हे हत्यार उपसले.त्यानंतर या विभागाने आर्थिक भानगडीत आकंठ बुडालेल्यांना घाम फोडण्यास सुरुवात केली.या ईडीच्या भितीने अनेक उद्योगपती गेल्या दशकभरात परदेशात फरार झाले,तर अनेक जण जेलची हवा खात आहेत.मात्र या ईडीवरून देशातील राजकारण आता चांगलेच तापले आहे.केंद्र सरकार राजकीय स्वार्थापोटी या विभागाचा गैरवापर करत असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून सातत्याने करण्यात येत आहे.ईडी स्थापन करताना परकीय विनिमय व्यवस्थापन अधिनियम ( एफइएमए ) १९९९ व अवैध मुद्रा रूपांतरण प्रतिबंध २००२,या दोन कायद्याची अंमलबजावणी करणे,असा उद्देश होता.मात्र तो सफल झाला का ? याविषयी देशात मतभिन्नता आहे.राजकीय द्वेष व बदनामी करण्यासाठी सध्या ईडीचा वापर होत असल्याचा आरोप करण्यात येत असतो.या विभागाची काम करण्याची पद्धत,त्यांच्यावर होणारे आरोप व गेल्या बारा वर्षात त्यांनी ज्या राजकीय नेत्यांना आपल्या जाळ्यात ओढले,त्याविषयीची माहिती आपण पुढील भागात घेणार आहोत..
क्रमशः

