संजय लांडगे,वाडा
खा.डॉ.सवरा यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्र्यांची भेट,
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान पालघर लोकसभा मतदारसंघाचे खा.डॉ. हेमंत विष्णू सवरा यांनी राज्यमंत्री ( स्वतंत्र प्रभार ) आयुष मंत्रालय आणि राज्यमंत्री आरोग्य व कुटुंब कल्याण, प्रतापराव जाधव यांची सदिच्छा भेट घेतली.या बैठकीत त्यांच्याकडे पालघर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण मागण्या करण्यात आल्या.
पालघर जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम वैद्यकीय सुविधा मिळाव्यात,यासाठी प्रस्तावित २०० खाटांचे जिल्हा रुग्णालय उभारणीसाठी आवश्यक अतिरिक्त निधी त्वरित मंजूर करावा,अशी मागणी खा.डॉ.हेमंत सवरा यांनी केली.या प्रकल्पासाठी कोट्यावधी रु.च्या निधीची गरज आहे.
हे रुग्णालय झाल्यास पालघर जिल्ह्यातील नागरिकांना मुंबई,ठाणे किंवा इतर ठिकाणी उपचारांसाठी जाण्याची गरज भासणार नाही,आणि त्यांना स्थानिक पातळीवरच चांगल्या आरोग्य सेवा उपलब्ध होतील.
यासंदर्भात केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी त्वरित दखल घेत पालघरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष चौधरी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून सविस्तर माहिती घेतली.तसेच आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा केली. योग्य त्या उपाययोजना त्वरित राबवण्याचे आश्वासन दिले.
पालघर जिल्ह्यातील आदिवासी व ग्रामीण भागातील नागरिकांना पारंपरिक आणि समग्र वैद्यकीय उपचार उपलब्ध व्हावेत,तसेच प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधांचा विस्तार व्हावा, यासाठी ” आयुष केंद्र,” स्थापनेची मागणीही यावेळी करण्यात आली.
आयुर्वेद,योग, निसर्गोपचार,युनानी,सिद्ध आणि होमिओपथी ( आयुष ) प्रणालीच्या माध्यमातून नागरिकांना स्वस्त आणि दर्जेदार उपचार मिळावेत,यासाठी केंद्र सरकारने तातडीने पावले उचलावीत,अशी विनंती करण्यात आली.
या महत्त्वाच्या मागण्यांची केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी गंभीर दखल घेतली असून,पालघर जिल्ह्यातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येतील,असे आश्वासन त्यांनी दिले.

