दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
राज्यातील शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले का हो ?
काल आपल्या वाढदिवसादिनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोडेसे आनंदी पाहायला मिळाले.त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कॉल केल्याचा कदाचित हा परिणाम असावा.कारण गेल्या काही दिवसांपासून शिंदे हे दिल्लीपासून दुरावले आहेत.पंतप्रधान मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या व सध्या काय चालले आहे ? आणि कुठे आहात ? अशी विचारणा केली.ज्यावेळी आपल्यापासून दुरावलेली एखादी व्यक्ती आपली आस्थेने चौकशी करतो,तेंव्हा त्या दुरावलेल्या व्यक्तीला खूप नाही पण किंचित बरं वाटू लागते.त्यामुळे खूप दिवसांनी का होईना,शिंदे हे माध्यमांसमोर बोलते झाले,आणि त्यांनी माध्यमांना खडेबोल सुनावले.
ते काय म्हणाले पहा जरा,ते म्हणाले,” मी गावी गेलो की माध्यमामध्ये लगेचच एकनाथ शिंदे सरकारमध्ये नाराज असून उठसुठ आपले दरे गाव गाठत असतात.खरं तर प्रवासासाठी १० तास खर्ची घालण्यापेक्षा मी हेलिकॉप्टरने जात असतो. तेवढ्या वेळात मी दहा हजार सह्या करतो.त्यासाठी माझ्या खिश्यात मी कायम दोन पेन बाळगतो.”
वास्तविक या महाराष्ट्राने आजवर अनेक मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पाहीले,पण उठसुठ गावी पळणारा व हेलिकॉप्टरने शेतात उतरणारा पहिलाच हायफाय मुख्यमंत्री आपण गेल्या तीन वर्षात पाहिला.शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्येही क्रमांक २ चे मंत्री होते,पण तेंव्हा मात्र यांच्या खिश्याला दोन पेन कधी पाहायला मिळाले नाही,किंवा त्याचा उल्लेख करताना हे शिंदे महाशय दिसले नाहीत.तसेच शेतात उतरणारे हेलिकॉप्टर देखील आपल्याला कधीच पाहायला मिळाले नाही.राज्यातील शेतकऱ्यांना एवढे सुगीचे दिवस आले आहेत तर आमचा अन्नदाता शेतकरी हा आत्महत्येच्या मार्गावर का जातो ? या प्रश्नाचे उत्तर शिंदे साहेबांनीच द्यायला हवे.राजकारण्यांची नाराजी ही कधीही लपून राहत नाही.आपलं इप्सित साध्य झाले नाही की त्याचे पडसाद आपली देहबोलीवर उमटत असतात.गेल्या दोन महिन्यांपासून शिंदे यांच्या बाबतीत हेच घडत आले आहे.देवा भाऊने राज्यातील लाडक्या बहिणीच्या या लाडक्या भावाला सध्या शेतीत नवनवीन प्रयोग करायला भाग पाडले आहे.या सर्व घडामोडीवर जर माध्यमांनी प्रकाशझोत टाकला तर शिंदे यांनी माध्यमांवर तोंडसुख घेता कामा नये.

