दीपक मोहिते,
” बॉटमलाईन,”
संपर्कमंत्रीपद : भाजप,आयुधासारखा वापर करणार…..
ज्या जिल्ह्यात आपला पालकमंत्री नाही,त्या जिल्ह्यात संपर्कमंत्री नेमण्याचा जो निर्णय भाजपने घेतला आहे तो शिंदे व अजित पवार गटांसाठी धोकादायक ठरणारा आहे.भाजप या पदाचा हा वापर हा आयुधासारखा करणार असल्याचे स्पष्ट होत आहे. नव्याने नियुक्त झालेले संपर्कमंत्री या दोन्ही गटाच्या पालकमंत्र्यांच्या कारभारावर देखरेख तर ठेवणारच,परंतु आपल्या पक्षासाठी हानिकारक ठरू शकतील,असे निर्णय ते घेऊ देणार नाहीत.एकंदरीत हे संपर्कमंत्री ” वॉच डॉग,” ची भूमिका पार पाडणार आहेत.
भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाची एक वेगळी छाप आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,या मातृसंघटनेच्या छत्रछायाखाली वाढलेल्या भाजपला संघाने आखून दिलेल्या चौकटीत काम करावे लागते.गेल्या दहा बारा वर्षात हे आपण सर्वांनी सातत्याने अनुभवले आहे.सत्तेच्या राजकारणात विविध राजकीय पक्षांना जवळ करून त्या पक्षाला कमकुवत करण्याची निती त्यांनी गेल्या बारा वर्षात अनेकदा वापरली आहे.महाराष्ट्र – शिवसेना ( उद्धव ठाकरे ) जम्मू-काश्मीर – नॅशनल कॉन्फरन्स ( फारुख अब्दुल्ला ) व पीडीपी ( मेहबुबा मुफ्ती )
आंध्र प्रदेश- वायएसआर काँग्रेस ( जगन रेड्डी ) गोवा – महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष,बिहार-जेडीयु ( नितीशकुमार ) पंजाब – कॅप्टन अमरिंदरसिंग ( पंजाब लोक काँग्रेस ) हरयाणा – जननायक जनता पार्टी ( दुष्यन्त चौटाला ) अशा अनेक प्रादेशिक पक्षाशी आघाड्या करत सत्ता काबीज केली.नितीशकुमार व फारुख अब्दुल्ला या दोघांचे पक्ष वगळता इतर पक्षांची गेल्या बारा वर्षात अक्षरशः वाताहत झाली.यानंतर एकनाथ शिंदे व त्यानंतर अजित पवार गटाचीही अशीच हालत होणार आहे.शिंदे गटाची गळचेपी सुरू झाली आहे.ती पूर्ण झाली की मग अजित पवार गटाचा नंबर लागण्याची शक्यता आहे.” ” वापरा व फेकून द्या,” अशी ही निती असून गेल्या एका तपात ( १२ वर्षाचा काळ ) जे पक्ष भाजपच्या नादी लागले,त्याची अवस्था कशी झाली ? हे लक्षात घेतल्यास आगामी काळात धर्मनिरपेक्ष व प्रादेशिक पक्ष नेस्तनाबूत करण्यात भाजप यशस्वी ठरेल,असे वाटते.त्यामुळे संपर्कमंत्री नियुक्त करण्यामागे भाजपचा हेतू प्रामाणिक नाही.महायुती सरकारमध्ये असलेल्या शिंदे व अजित पवार गटाला नामोहरम करण्यासाठी देवाभाऊने या आयुधाची निर्मिती केली आहे.

