दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
शेतकरी,बेरोजगार व सर्वसामान्य माणूस मेला तरी बेहत्तर…!
तीन वर्षांपूर्वी राज्यात सत्तापालट झाल्यापासून सर्वच पक्षात ” फोडाफोडीच्या राजकारणा,” ला आता राजाश्रय मिळू लागला आहे.दर दिवशी अमुक माजी आमदार,तमुक पदाधिकारी या पक्षात गेला,त्या पक्षात गेला,अमुक पदाधिकारी नाराज असून लवकरच तो या पक्षात दाखल होणार,अशा आशयाच्या बातम्या सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहेत.
एकमेकांचे आमदार,खासदार व पदाधिकारी गळाला लावणे,हे आता राष्ट्रीय कार्य आहे,असा समज जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी करून घेतला आहे.
वास्तविक राज्यात लोकहीत, विकास व जनतेच्या दैनंदिन जीवनातील अनेक प्रश्न आ वासून उभे असताना या राजकीय पक्षांनी फोडाफोडीच्या राजकारणाला सर्वोच्च प्राधान्य दिल्याचे दिसून आले आहे.राज्यात कृषी,आरोग्य,रोजगार,
शिक्षण व पायाभूत सोयी-सुविधांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत,पण आपले मायबाप सरकार हे आपली सत्ता अबाधित कशी राहील,यासाठी आपली शक्ती,जनतेचा पैसा खर्ची घालत आहे.राज्यातील शेतकरी सोयाबीन,कापूस व भात,या कृषी उत्पन्नांना योग्य हमीभाव मिळत नसल्यामुळे तसेच नाफेड कडून होणारी खरेदी अचानकपणे स्थगित करत असल्यामुळे शेतकरी पुन्हा आत्महत्येच्या वाटेवर जाण्याची शक्यता आहे.पण आपल्या मायबाप सरकारला त्याच्याशी काहीही देणेघेणे नाही.परदेशात सरकारे ज्या शेतकऱ्याला हाताच्या फोडासारखे जपते,त्यांच्या हिताचे निर्णय घेते, नेमके त्याच्या उलट आपले सरकार मात्र आपल्या शेतकऱ्याच्या टाळूवरील लोणी ओरबाडण्यात धन्यता मानत आहे.आपल्या देशातील नफेखोर व्यापारी,कृषी उत्पन्नाचे भाव पाडून खरेदी करू पाहत असतात,पण त्यावर नियंत्रण आणण्याऐवजी आपले सरकार बघ्याची भूमिका घेत आहे.६० % खरेदी झाल्यानंतर नाफेडने सोयाबीनची खरेदी बंद केली.त्यामुळे हजारो शेतकऱ्यांचा सोयाबीन घरात पडून आहे.तो अधिक काळ घरात पडून राहण्यापेक्षा तो कमी दराने व्यापाऱ्यांना विकून टाकू,अशा निर्णयाप्रत शेतकरी आले आहेत.अशीच गत कापसाचीही झाली आहे.नाफेडचे अधिकारी व व्यापारी,या दोघांच्या मिलीभगतमुळे ग्रामीण भागातील शेतकरी नागवला जात आहे.पण आपले मायबाप सरकार हे संगीत खुर्चीच्या जीवघेण्या खेळात रममाण झाले आहे.राज्यावर ९ लाख कोटी रु.चे कर्ज झाले आहे,परकीय गुंतवणूक व उद्योगधंदे आणण्यासाठी दावोस येथे जाऊन कोटी कोटीची उड्डाणे घेणारे मुख्यमंत्री फडणवीस व त्यांचे सहकारी लोकांच्या डोळ्यात धूळफेक करत आहेत,पण त्यांचे अंधभक्त मात्र,” सिर्फ देवाभाऊही सबकुछ है,” असा दिंडोरा पिटण्यात धन्यता मानत आहेत.आज ग्रामीण भागातील सुशिक्षित तरुण बेरोजगार हा अस्वस्थ झाला आहे.त्यामुळे तो रोजगाराच्या शोधात शहरी भागात स्थलांतरीत होऊ लागला आहे.ज्या राज्यात शेतकरी व बेरोजगार तरुण भितीच्या सावटाखाली वावरत असतो,ते राज्य कधीही सुजलाम-सुफलाम होऊ शकत नाही,याचे भान आपल्या सरकारने ठेवायला हवे.

