दीपक मोहिते,
भाजपचे लक्ष आता बिहार व प.बंगाल या दोन महत्वाच्या राज्यावर….
दिल्ली काबीज केल्यानंतर १५ राज्यात भाजपाकडे इकहाती सत्ता आहे.एवढेच नव्हे तर देशाची राजधानी दिल्लीतील मोठ्या विजयानंतर एनडीएकडे दोन्ही केंद्रशासित प्रदेशात सत्ता हाती आली आहे.यानंतर भाजपचे लक्ष आता बिहार व प. बंगाल या दोन राज्यावर आहॆ.देशाचा दक्षिण भाग वगळता भाजपने काही किरकोळ अपवाद वगळता उत्तर,मध्य,उत्तरपूर्व, दक्षिणोत्तर भागात आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहॆ.आजच्या घडीला देशातील पाच मोठ्या राज्यांपैकी यूपी,महाराष्ट्र व बिहार,तीन राज्यात रालोआचे सरकार आहे.युपी आणि महाराष्ट्रात भाजपाचा स्वत:चा मुख्यमंत्री आहे.तर बिहारमध्ये भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या जेडीयूचे नितीश कुमार यांच्या हाती मुख्यमंत्रीपदाचे सुकाणू आहॆ.

उत्तर-पूर्व भागातील सात पैकी सहा राज्यात एनडीएचा कब्जा आहे.देशाच्या उत्तर – पूर्व भागात केवळ मिझोरममध्ये एनडीएचे सरकार आहे.तसेच प्रकारे डोंगराळ प्रदेश असलेल्या तीन राज्यांपैकी ( जम्मू-कश्मीर,उत्तराखंड आणि हिमाचल ) केवळ उत्तराखंडमध्ये भाजप स्वबळावर सत्तेत आहे.जम्मू काश्मीरमध्ये उमर अब्दुल्ला तर हिमाचल प्रदेशात कांग्रेसचे सुखविंदर सिंह सुक्खू मुख्यमंत्री आहेत.
मध्य प्रदेश,छत्तीसगड आणि राजस्थानसह महाराष्ट्र आणि गुजरात येथे भाजपचे सरकार आहे.२०२२ मध्ये गुजरात आणि २०२३ मध्ये मध्य प्रदेश,छत्तीसगड आणि राजस्थानात भाजपाने विजय मिळवला होता.महाराष्ट्रात नोव्हें.२०२४ मध्ये भाजपाप्रणीत महायुतीचा विजय झाला.उत्तर भारतात बिहार व उत्तर प्रदेश या दोन राज्यात रालोआची सत्ता आहे. झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडीची सरकारे आहेत,पण इंडिया आघाडीमध्ये सध्या धुसफुस सुरु असल्यामुळे ही दोन्ही राज्ये देखील भाजपच्या पंखाखाली जातील,अशी शक्यता आहॆ.तर दक्षिण भारतातील पाच पैकी चार राज्यात इंडिया आघाडीचे सरकार आहे.केरळ,तेलंगाना, कर्नाटक आणि तामिळनाडुत इंडिया आघाडी सत्तेत आहे.तर आंध्रप्रदेशात तेलूगू देशमचे चंद्रबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार आहे.
आपल्या देशाची लोकसंख्या १४० कोटीच्या घरात आहे. दिल्लीच्या विजयानंतर एनडीएचे ९२ कोटी जनतेवर भाजप व भाजपप्रणित सरकारचे शासन आहे.१० कोटीहून अधिक लोकसंख्येच्या उत्तर प्रदेश ( २४ कोटी ), महाराष्ट्र (१२ कोटी ) आणि बिहारमध्ये ( १२ कोटी ) या तीन राजकीयदृष्ट्या महत्वाच्या राज्यावर रालोआची सत्ता आहे.१० कोटी किंवा त्याहून जादा लोकसंख्या असलेल्या एकाही राज्यात इंडिया आघाडीचे सरकार नाही.
२०१८ मध्ये देशाच्या राजकीय नकाशावर भाजप आघाडीवर होती.त्यावेळी २० राज्यात भाजपाचे राज्य होते.यामध्ये पूर्वोंत्तर येथील सर्व ७ राज्यांशिवाय उत्तर प्रदेश, उत्तराखंड,हिमाचल,गुजरात, राजस्थान,मध्य प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा आणि महाराष्ट्र या राज्यांचा समावेश होता.त्यानंतर अनेक राज्यात भाजपला पराभवाचे धक्के बसले.सात वर्षांनंतर आता भाजपाने आपलाच रेकॉर्ड तोडत २१ राज्यात सत्ता मिळवली आहे.हरियाणा,महाराष्ट्र व आता दिल्ली,असे सलग तीन विजय मिळवल्यामुळे भाजपचा आत्मविश्वास दुणावला आहॆ.आगामी काळात होऊ घातलेल्या बिहार आणि प.बंगाल या दोन राज्यावर त्यांची घारीसारखी नजर आहॆ.प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची सत्ता उखडून टाकण्यासाठी मोदी व शहा,आता जोमाने कामाला लागतील,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहॆ.

