दीपक मोहिते,
” परिसराचा विनाश अटळ,”
प्रस्तावित वाढवण बंदर परिसरात आकाराला येणार नवीन शहर : भुमाफियांसाठी पर्वणी,
देशातील सर्वांत मोठे बंदर म्हणून ओळख असलेल्या ” वाढवण,” पंचक्रोशी परिसरात आणखी एक शहर वसवण्याचचा केंद्र व राज्य सरकारचा प्रयत्न असून त्यासाठी नियोजन करण्यात येत आहे.सरकारच्या या हालचालाची कुणकुण भुमाफियाना लागल्यानंतर त्यांनी या परिसरातील जमिनी खरेदी करण्याचा सपाटा लावला आहॆ.या गोरखधंद्यात अनेक मंत्री,आमदार व भुमाफियांचे साटेलोटे असून गेल्या काही महिन्यात शेकडो हे.जमिनीचे खरेदी-विक्री झाली आहॆ.
या प्रस्तावित बंदरामुळे विकासाची संधी लक्षात घेत राज्य सरकारने १३ गावातील ३३.८८ चौ. किमी क्षेत्रामध्ये विकास केंद्र ( ग्रोथ सेंटर ) करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने ( एम.एस.आर.डी.सी.) १०७ गावांतील ५१२ चौ.कि.मी. क्षेत्राचा विकास केंद्रात समावेश करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास वाढवणजवळ आणखी एक मुंबई आकाराला येऊ शकते.त्यासाठी
एमएसआरडीसी ३८८ कि.मी. लांबीचा कोकण द्रुतगती महामार्ग आणि ४९८ कि.मी. लांबीचा रेवस-रेडी सागरी किनारा मार्ग बांधणार आहे. या प्रकल्पांलगत १०५ गावांतील ४४९.३ चौ.कि.मी. क्षेत्रावर १३ विकास केंद्रे होणार असून एमएसआरडीसी विशेष नियोजन प्राधिकरण आहे.या विकास केंद्रांमध्ये वाढवण विकास केंद्राचाही समावेश आहे.वाढवण,आंबिस्ते, वासगाव,वरोर,तडियाळे , धुमकेत,गुंगवाडा,पोखरण,
बाडापोफरण,चंडीगाव आणि धाकटी डहाणू अशा ११ गावांमधील ३३.८८ चौ.कि.मी. क्षेत्रावर विकास केंद्राचे नियोजन असताना आता थेट ५१२ चौ.कि.मी.इतक्या मोठ्या क्षेत्राचा विकास करावा,असा प्रस्ताव देण्यात आला आहे.प्रस्तावाच्या मान्यतेची प्रतिक्षा असल्याची माहिती एमएसआरडीसीतील सूत्रांनी दिली.वाढवण हे जागातील पहिल्या १० मोठ्या बंदरांपैकी एक आहे, या बंदरामुळे भविष्यात वाढवण आणि पालघरचा विकास झपाट्याने होणार आहे.ही बाब लक्षात घेता येथे अनेक सुविधा विकसित करणे,आवश्यक आहे.त्यातून सरकारने वाढवण विकास केंद्राचा निर्णय घेतला आहॆ.

एमएसआरडीसीने ३३.८८ चौ. कि.मी.क्षेत्रासाठी विकास योजना तयार करण्याच्या कामास सुरुवात केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहॆ.जमीन वापर नकाशा,अधिसूचित क्षेत्राचे सर्वेक्षण आणि अन्य अभ्यास या कामांना सुरुवात झाली आहे.ही कामे झाल्यानंतर त्यावर नागरिकांच्या सूचना-हरकती मागवण्यात येणार आहेत.आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर असल्यामुळे रस्ते-वाहतुकीचे नियोजन, कंटेनर डेपो,लॉजिस्टीक पार्क,अनुषंगिक उद्याोग आदीचा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे.

