दीपक मोहिते,
” दिल्लीच्या क्षितिजवरून,”
दिल्ली विधानसभा निवडणूक : आप पुन्हा बाजी मारणार ?
दिल्लीचे तख्त आम आदमी पार्टीकडून हिसकावून घेण्यासाठी भाजपने विधानसभा निवडणुकीत आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे.त्यांचे हे प्रयत्न किती यशस्वी ठरतात,हे ८ फेब्रू.रोजी होणाऱ्या मतमोजणीतून स्पष्ट होणार आहे.गेली अनेक वर्षे देशाची राजधानी असलेले राज्य आपल्या ताब्यात येत नाही,हे फार मोठे शल्य भाजपला बोचत आहे.त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल,मनिष सिसोदिया,खा.संजयसिंग या तिघांच्या मागे विविध तपास यंत्रणांचा सासेमिरा लावला व त्यांना कारावास भोगायला लावला.अशा या प्रयत्नातून अरविंद केजरीवाल यांची जनमानसात असलेली प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला गेला.त्यांचे हे प्रयत्न किती यशस्वी ठरतात,हे ८ फेब्रु.रोजी होणाऱ्या मतमोजणीमध्ये पाहायला मिळणार आहे.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने १९९८ ते २००८ शिला दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली सलग दहा वर्षे सत्ता राखली.त्यानंतर समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलेल्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनामुळे दीक्षित यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले.नंतर झालेल्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांनी भाजप व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा धुव्वा उडवला.२०१५ व २०२० च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांच्या आम आदमी पार्टीने या दोन्ही पक्षांना धूळ चारली.सलग निवडणुका जिंकणारे केजरीवाल आपल्या भ्रष्टाचारविरोधी भूमिका व शिक्षण क्षेत्रात केलेल्या सुधारणा,अशा दोन कारणांमुळे ते दिल्लीकरांच्या गळ्यात ताईत बनले.साम, दाम,दंड व भेद याचा पुरेपूर वापर करूनही भाजपला त्यांची तटबंदी फोडणे शक्य झाले नाही.गेल्या निवडणुकीत आपने ७० जागांपैकी ६२ जागा जिंकत आपले निर्विवाद वर्चस्व राखले होते.तर भाजपला केवळ ८ जागांवर समाधान मानावे लागले.भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पाटी मात्र कोरीच राहिली.मात्र गेल्या पाच वर्षात आपच्या प्रमुख नेत्यांवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपमुळे आम आदमी पार्टीची प्रतिमा पार डागाळली गेली आहे.त्यांच्या विरोधात निर्माण झालेली अँटी इन्कबन्सी त्यांना किती फटका देते,यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे.एकूण ७० जागा असलेली ही विधानसभा जिंकण्यासाठी त्याना ३६ हा जादुई आकडा गाठावा लागणार आहॆ.निवडणुकीचे चित्र पाहता आम आदमी पार्टी पुन्हा बाजी मारेल,असा अंदाज आहॆ.

