दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
माध्यमांना कमी लेखून चालणार नाही……
गेल्या दोन दिवसापूर्वी सामना या दैनिकात प्रसिद्ध झालेल्या ” रोखठोक,” या सदराने महायुतीची अक्षरशः झोप उडवली आहे.या सदरातून महायुतीमध्ये सध्या काय चालले आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवाची घालमेल व ते कसे कोलमडून गेले आहेत.यावर स्तंभलेखकाने चांगलाच प्रकाशझोत टाकला आहे.हा लेख सत्ताधाऱ्यांच्या जिव्हारी लागला असून त्यांचे प्रवक्ते सध्या या लेखामुळे हडबडून गेले असून त्यावर तुटून पडत आहेत.परंतु त्यांच्या पोपटपंचीला मात्र जनाधार मिळत नाही.
मंत्रिमंडळ स्थापन झाल्यापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हसरा चेहरा व उत्साह हा दरे गावच्या जंगलात हरवला आहॆ.त्यांनी जे उद्धव ठाकरे यांच्यासोबत केले,तोच प्रकार भाजप आता त्यांच्यासमवेत करत आहॆ.आपल्याला पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळेल,अशा आशेवर असलेल्या शिंदे यांना अमित शहा व देवेंद्र फडणवीस यांनी दोन महिन्यापूर्वी कात्रजचा घाट दाखवला.तीन वर्षांपूर्वी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर हे शिंदे महाशय,दररोज शहा व मोदी पुराण वाचत असत.या दोघांचे कौतुक करण्यासाठी ते व अजित पवार यांच्यामध्ये जणू काही स्पर्धाच लागायची.दर आठवड्याला त्यांची दिल्लीवारी होत असे पण आता त्यांच्या दरे गावाच्या चकरा वाढल्या आहेत.विधानसभा निवडणुकीनंतर अमित शहा यांनी अचानकपणे वाघनखे बाहेर काढली व शिंदे घायाळ झाले.२०१९ साली याच अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना चार भिंतीच्या आत धोबीपछाड दिला होता.तो अनुभव गाठीशी असताना शिंदेसारखा शिलेदार कसा काय गाफील राहिला,हे एक न उलगडणारे कोडेच आहे.भाजपच्या कुरघोडीमुळे आज एकनाथ शिंदे हे पार कोलमडून गेले असल्याचा दावा,” रोखठोक,” च्या लेखात करण्यात आला आहे,तो मुळात चुकीचा नाही.कारण,हल्ली शिंदे हे छोट्या पडद्यावर पाहायला मिळत नाही.त्यांच्या नाराजीची झळ आपल्याला बसू नये,यासाठी भाजपने त्यांचे आमदार फोडून ” बी,” टीम तयार ठेवली आहॆ.त्यासाठी पूर्ण तयारी केली आहे.त्यासाठी मंत्रिमंडळात असलेल्या शिंदे यांच्या एका शिलेदारावर जबाबदारी टाकण्यात आली आहे.सध्या हा नेता इन्कार करत असला तरी,भविष्यात ” मिशन लोटस, ” होणारच नाही,याची शाश्वती तोही देऊ शकत नाही.
” सामना,” या दैनिकाने महायुती सरकारविरोधात जी मोहीम सुरू केली आहे.त्याला जनमानसात चांगला पाठिंबा मिळत आहे.त्यामुळे महायुतीचे नेते धायकुतीला आले आहेत.उद्या या दैनिकात आपल्या सरकारविरोधात काय छापून येईल,अशी भिती या नेतेमंडळीत सतत असते.ही घटना माध्यमाची ताकद अधोरेखित करणारी आहॆ.या दैनिकात सरकार विरोधात काही छापून आले की शिंदे व भाजपचे शिलेदार हे वेळ न दवडता खुलासे करत असतात,ही खरी माध्यमाची ताकद आहे.त्यामुळे राजकीय नेत्यांनी माध्यमाना कधीही कमी लेखता कामा नये.

