दीपक मोहिते,
देशभरात भारतीय तटरक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा,
भारतीय तटरक्षक दल दिन दरवर्षी १ फेब्रु.रोजी साजरा करण्यात येत असतो.पालघर जिल्ह्यात तो डहाणू तालुक्यातील चिखले गावातील तटरक्षक दलाच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आपल्या सागरी क्षमतेसाठी ओळखले जाणारे,तटरक्षक दल भारताच्या सागरी हितांचे रक्षण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.सागरी तटरक्षक दल म्हणजेच भारताच्या सागरी किनाऱ्याचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेले लष्करी दल होय.या तटरक्षक दलाचे मुख्य कार्य म्हणजे सागरी किनाऱ्यावर अनधिकृत किंवा अनियमित हालचाली असे काही आढळले तर त्यावर तात्काळ योग्य ती कारवाई करणे असे आहे. सागरी तटरक्षक दलाचे मुख्य कार्यालय हे नवी दिल्ली येथे आहे.याशिवाय या दलाचे चार प्रादेशिक विभाग असून, त्यांची मुख्यालये मुंबई,चेन्नई, पोर्टब्लेअर आणि गांधीनगर येथे आहेत.ही चार प्रादेशिक मुख्यालये भारताच्या संपूर्ण सागरी किनाऱ्यावर अकरा जिल्हा तटरक्षक दल व सहा तटरक्षक स्थानकातर्फे काम करतात.भारतीय सागरी तटरक्षक दलाचे बोधवाक्य हे ” वयम् रक्षमः,”असे आहे. याचाच अर्थ “आम्ही संरक्षण करतो,” असा आहे.
स्थापनेचा इतिहास
भारतीय तटरक्षक दलाच्या स्थापनेसाठी सप्टें.१९७४ मध्ये के.एफ.रुस्तमजी यांच्या अध्यक्षतेखाली सागरी तस्करांना प्रतिबंध करण्यासाठी तटरक्षक दलासारख्या संघटनेच्या स्थापनेसाठी समिती स्थापन करण्यात आली होती.या समितीनं तटरक्षक दलाची स्थापना करण्याची शिफारस केली.तटरक्षक दल भारतीय युद्धाचा काळ सुरु नसताना सागरी सीमांचे सरक्षण करण्याचे काम करेल.२५ ऑगस्ट १९७६ भारत सागरी क्षेत्र अधिनियम मंजूर झाला.भारताने २ लाख वर्ग किलोमीटर सागरी क्षेत्रावर मालकी सांगितली.त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाने १ फेब्रु. १९७७ रोजी तटरक्षक दलाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला.भारतीय संसदेने १८ ऑगस्ट १९७८ रोजी भारतीय तटरक्षक अधिनियम १९७८ मंजूर करुन तटरक्षक दलाच्या स्थापनेला मंजुरी दिली.भारतीय तटरक्षक दल राष्ट्रीय संरक्षण,कृत्रिम भूमीची सुरक्षा,किनारपट्टी सुरक्षा, कायद्याची अंमलबजावणी, सागरी पर्यावरण संरक्षण आणि वैज्ञानिक डेटा संग्रह यांचा समावेश असलेल्या ऑपरेशन्सचे स्पेक्ट्रम पार पाडते.भारतीय तटरक्षक दल त्याच्या स्थापनेपासून अनेक शोध आणि बचाव कार्ये, तस्करीविरोधी उपक्रम राबवले आहेत आणि विविध आपत्कालीन परिस्थितीत मदत केली आहे.त्यामुळे आपली सागरी सुरक्षा अबाधित राहू शकली.
गुजरातमधील पोरबंदरहून इराणमधील बंदर अब्बास बंदराकडे जाताना उत्तर अरबी समुद्रात बुडालेल्या एका व्यापारी जहाजातील १२ कर्मचाऱ्यांना भारतीय तटरक्षक दलाने वाचवले होते. भारतीय जलसीमेबाहेर पाकिस्तानच्या शोध आणि बचाव क्षेत्रात एमएसव्ही अल पिरानपीर जहाज बुडाले.यात भारतीय तटरक्षक दलाने पाकिस्तान सागरी सुरक्षा एजन्सीच्या सहकार्याने बचाव कार्य केले.कर्तबगाराच्या अश्या किती तरी गोष्टी तटरक्षक दलाच्या नावावर आहेत.शांततेच्या काळात भारतीय तटरक्षक दल देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करते.हे दल दरवर्षी शेकडो वेगवेगळ्या पदांवर भरती करते.या दिवशी भारतीय तटरक्षक दल कमांडंट,असिस्टंट कमांडंट आणि इंजिनीअर अशा विविध पदांची भरती करते.तटरक्षक दलात खलाशासाठी तीन प्रकारची पदे आहेत. मेकॅनिकल,नाविक जीडी आणि नाविक डोमेस्टिक शाखा. या सर्वांची वयोमर्यादा १८ ते २२ वर्षे आहे.राखीव प्रवर्गातील उमेदवारांना तीन ते पाच वर्षांची सूट मिळते.
भारतीय तटरक्षक दल हे दिवसरात्र सागरी सुरक्षेचे कवच म्हणून काम करत असते.

