दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
पालघर जिल्हा,चौथी मुंबई : पालकमंत्र्यांचे स्वप्न,” मुंगेरीलालके हसीन सपने,” ठरता कामा नये,
तिसऱ्या डहाणू फेस्टिवलच्या उदघाटनप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वनमंत्री गणेश नाईक यांनी पालघर जिल्हा,हा आगामी काळात चौथी मुंबई म्हणून नावारूपाला येणार असल्याची प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.त्यांच्या या वक्तव्याचे जिल्ह्यात सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहराच्या वेशीवर असलेल्या जिल्ह्याचा ग्रामीण आजही अंधारात चाचपडत आहे.जिल्ह्याच्या विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.या स्थितीला लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांची मानसिकता कारणीभूत आहे.पाणी,आरोग्य,
शिक्षण,रोजगार,उद्योगवाढ,महिला व एकात्मिक बालविकास,कृषी,
दळणवळण व पायाभूत सोयी-सुविधा इ.क्षेत्राचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत.२५ वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे एका कार्यक्रमांसाठी विरार येथे आले होते,त्यावेळी त्यांनी वसई-विरार उपप्रदेश हा तिसरी मुंबई म्हणून उदयाला येत असल्याचे आपल्या भाषणात म्हंटलं होतं.आज त्या उपप्रदेशाची अवस्था कशी झाली आहे,ते आपण अनुभवत आहोत.
चालायला धड रस्ते नाहीत,पदपथावर अनधिकृत फेरीवाल्यांचे अतिक्रमण,हजारो अनधिकृत रिक्षांचा सुळसुळाट,विस्कळीत पाणीपुरवठा,बेसुमार अनधिकृत बांधकामे,महानगरपालिका अधिकाऱ्यांचा खादाडपणा,नियोजनबद्ध विकासाचे अधिकार असलेल्या महानगरपालिकेचा नियोजनशून्य कारभार,इ.कारणाने स्व.विलासराव देशमुख यांच्या स्वप्नातील तिसऱ्या मुंबईच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या. त्यांच्या स्वप्नातील तिसरी मुंबई प्रत्यक्षात आकारालाच आली नाही.या उपप्रदेशाची अवस्था अशी झाली असताना आता पालकमंत्री गणेश नाईक यांनीही दिवसाढवळ्या चौथ्या मुंबईचे स्वप्न पाहिले आहे.गणेश नाईक यांनी पालकमंत्री म्हणून नुकतीच सूत्रे हाती घेतली आहेत.त्यामुळे त्यांनी हे वक्तव्य करण्यापूर्वी सर्वप्रथम डहाणू,विक्रमगड,जव्हार,
मोखाडा,खोडाळा या परिसराचा दौरा करायला हवा होता.या भागातील जनतेच्या हालअपेष्टा नजरेखालून घालायला हव्या होत्या.गावपाड्यावर असलेल्या पायवाटा,आदिवासी समाजाच्या पाचवीला पूजलेले कुपोषण,पाणीटंचाई,जिल्हा परिषदेच्या बंद पडणाऱ्या शाळा,विद्यार्थ्यांची गळती,पाण्याच्या पर्यायी व्यवस्थेअभावी कृषीक्षेत्राची झालेली दुरावस्था,अन्नधान्य वितरण व्यवस्थेतील बजबजपुरी,मासेमारी व्यवसायसंदर्भात सरकार दरबारी असलेली उदासीनता, समुद्रात वाढते प्रदूषण व तेलक्षेत्र,विविध विनाशकारी प्रकल्पाचे समुद्रकिनारी होत आक्रमणे,वाढती बेरोजगारी,अंगणवाड्या व आश्रमशाळा व्यवस्था विस्कळीत करण्याचे वाढते प्रकार,याविषयी जोवर कठोर उपाययोजना सरकारकडून होणार नाहीत,तोवर चौथ्या मुंबईचे स्वप्न पाहणे,हे ” मुंगेरीलाल के हसीन सपने,” पाहण्यासारखे आहॆ.
२०१४ साली नव्याने पालघर जिल्हा अस्तित्वात आल्यानंतर जिल्ह्याला प्रचंड प्रमाणात आर्थिक निधी मिळाला,तो निधी कुठे वापरण्यात आला ? याचा शोध घेऊन पालकमंत्र्यांनी पावले टाकायला हवीत.अन्यथा त्यांचे हे वक्तव्य म्हणजे ” बोलाची कढी आणि बोलाचाच भात,” असं म्हणायची पाळी जिल्हावासियांवर येणार आहॆ.

