दीपक मोहिते,
संवेदना,
रेल्वे अधिकाऱ्याकडून जिल्ह्यातील कोकणवासीयांना सावत्रपणाची वागणूक,
वसईहुन थेट सावंतवाडी अशी गाडी सुरू करा,अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून डहाणू-भाईंदर परिसरात राहणाऱ्या कोकणवासीयांनी लावून धरली आहे.पण रेल्वे बोर्ड त्यांच्या या मागणीला सातत्याने केराची टोपली दाखवत आहे.वसई,मीरा- भाईंदर,पालघर व डहाणू या चार तालुक्यात सुमारे १० ते १५ लाख कोकणवासीय नागरिक राहत आहेत.
सध्या या मार्गावर दररोज चार ते पाच गाड्या सावंतवाडीला येजा करत असतात,पण या गाड्यामध्ये वसई पालघर व डहाणू येथील प्रवाशांसाठी पुरेसा आरक्षण कोटा नसल्यामुळे त्यांचे मोठ्याप्रमाणात हाल होत असतात.या सर्व गाड्या इतर राज्यातून येत असतात,त्यामुळे येथील प्रवाशांना पुरेसे आरक्षण मिळत नाही.त्यामुळे त्यांना महागड्या खाजगी बसेसचा पर्याय स्विकारावा लागतो.अशावेळी खाजगी प्रवासी कंपन्यांचे ऑपरेटर त्यांच्याकडून भरमसाठ
प्रवासी भाडे आकारात असतात.दिवाळी व उन्हाळी सुट्टीदरम्यान ही मंडळी कोकणवासीयांची प्रचंड लूट करतात.त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून येथील प्रवासी संघटना,दररोज वसईहुन थेट सावंतवाडी दरम्यान एक गाडी सोडण्यात यावी, अशी मागणी करत आहेत.मात्र रेल्वे बोर्डाचे अधिकारी कोकणवासीयांच्या या रास्त मागणीची दखल घेत नाहीत.बुलेट ट्रेनचे स्वप्न उराशी बाळगणारे व देशभरात भरमसाठ वंदे भारत एक्प्रेस सुरू करणारे रेल्वे मंत्रालय याप्रश्नी कोकणवासीयांना सावत्रपणाची वागणूक देत असल्याचे दिसून आले आहे.या प्रकरणी कोकणातील पत्रकारांचे एक शिष्टमंडळ लवकरच दिल्लीला जाऊन केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट घेणार आहेत.

