दीपक मोहिते,
” उपरती,”
राज ठाकरे यांनी आत्मचिंतन करायला हवं,
विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे शल्य अद्याप टोचत असल्यामुळे काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार व विरोधी पक्षांवर गरळ ओकली.ते पक्षाच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते.यावेळी त्यांनी निवडणूक प्रक्रियेवर कडाडून हल्ला चढवला.अनेक उदाहरणे देत त्यांनी महायुतीच्या विजयाचे वाभाडे काढले.पण या मेळाव्यात उत्साह व जोश याचा अभाव होता.
यावेळी केलेल्या भाषणात ते पुढे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत केवळ एक जागा जिंकणाऱ्या अजित पवार यांना विधानसभा निवडणुकीत ४१ जागा मिळतात,यावर विश्वास तरी कसा ठेवायचा ? निवडून आलेल्या त्यांच्या आमदारांनाही अद्याप आपण विजयी झालो आहोत,यावर विश्वास बसलेला नाही.त्यांच्या या बोलण्यातून निवडणूक प्रक्रियेत फार मोठी गडबड झाल्याचे ध्वनित होत होते.त्याचबरोबर त्यांनी आपण वारंवार भूमिका बदलत असतो,या विरोधक व पत्रकाराकडून होणाऱ्या आरोपाचा समाचार घेतला ते म्हणाले,मी कधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भलामण करतो तर कधी विरोधाची भूमिका घेतो,असा विरोधक कायम आरोप करत असतात.भारतीय राजकारणात कोणकोणत्या पक्षानी वेळोवेळी आपल्या भूमिका बदलल्या,त्याची जंत्रीच त्यांनी यावेळी वाचून दाखवली.पण दावणीला बांधले गेलेले पत्रकार व विरोधी पक्ष मात्र केवळ आपल्याला लक्ष्य करतात.विधानसभा निवडणुकीत आपल्याला मतदान झाले,पण ते आपल्यापर्यंत पोहोचले नाही,असे सांगत त्यांनी ईव्हीएम मशीनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा आयोजित केला होता.या मेळाव्यास राज्यभरातून पदाधिकारी उपस्थित होते.पण या मेळाव्यात पूर्वीसारखा जोश बघायला मिळाला नाही.नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत माहीम विधानसभा मतदारसंघात त्यांच्या चिरंजीवाचा झालेला पराभव,हा त्यांच्या जिव्हारी लागला आहे.या निवडणुकीत त्यांचे बाळा नांदगावकर,अविनाश जाधव,संदीप देशपांडे व अन्य दुसऱ्या फळीतील मोहरे गारद झाले.त्यांच्या जाहीर सभांना होणारी गर्दी लक्षात घेता,आपल्याला मतदान का होत नाही,याविषयी त्यांनी गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे.तसेच वारंवार भूमिका बदलल्यामुळे मतदार त्यांना थारा देत नाहीत,हे अनेकदा सिद्ध झाले आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी ठाणे,नाशिक व सिंधुदुर्ग मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांसाठी जाहीर सभा घेतल्या होत्या.त्याच राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत माहीम मतदारसंघात महायुतीचे सदा सरवणकर यांच्या विरोधात आपले चिरंजीव अमित ठाकरे यांना उतरवले.या मतदारसंघात त्यांना आपला फाजील आत्मविश्वास नडला. महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर हे आपली उमेदवारी मागे घेण्यासंदर्भात त्यांच्या भेटीसाठी निवासस्थानी गेले असता,त्यांनी भेट नाकारली.त्यामुळे सरवणकर यांनी माघार न घेता निवडणूक लढण्याचे ठरवले व दोघांचाही घात झाला.येथे जर राज यांनी समजुतदारपणा दाखवला असता उद्धव ठाकरे यांचा उमेदवार निवडून आला नसता.राज ठाकरे ज्या परिसरात राहतात,तेथे त्यांचे चिरंजीव पराभूत होतात,हे काही चांगले लक्षण नाही.केवळ दुसऱ्यांच्या नावाने भुई धोपटल्यामुळे वास्तव कधीही लपून राहत नाही,हे राज ठाकरे यांनी आता लक्षात घ्यायला हवे.पत्रकारांना दोन गोष्टी सूनावण्यापेक्षा त्यांनी मतदार आपल्याला का जवळ करत नाहीत,यावर आत्मचिंतन करायला हवे.

