दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट प्रचंड तणावाखाली,
विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर शिवसेनेचे ( एकनाथ शिंदे ) ग्रहमान फिरले असून या गटाला चारी बाजूने दाबण्याच्या भाजपच्या प्रयत्नाला चांगलाच वेग आला आहे.पालघर,ठाणे,रायगड व नाशिक जिल्ह्यात एकनाथ शिंदे गटाचे चांगले वर्चस्व असताना देखील ठाणे वगळता उर्वरित जिल्ह्याची पालकमंत्रीपदे त्यांना मिळू शकली नाहीत.यापूर्वी निवडणुकीत तिकीतवाटप,निवडणुका जिंकल्यानंतर मंत्रीपदे,खाते व पालकमंत्रीपदे वाटप प्रक्रियेत भाजप व अजित पवार गटाने त्यांची चांगलीच कोंडी केली आहे.
आता तर ठाणे जिल्ह्यातील शिंदे यांचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी भाजपने गणेश नाईक यांना ठाण्याच्या मैदानात उतरवले आहे.गणेश नाईक व एकनाथ शिंदे या दोघांमध्ये विळ्याभोपळ्याचे नाते आहे.गणेश नाईक यांचे चिरंजीव संजीव नाईक,हे ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते,पण शिंदे यांनी आपले सर्वस्व पणाला लावून नरेश म्हस्के याना उमेदवारी मिळवून दिली व त्यांना निवडूनही आणले.वास्तविक ठाण्यासारख्या महत्वाच्या जिल्ह्यात आपले अस्तित्व नाममात्र असणे,ही बाब भाजपला परवडणारी नाही,त्यामुळे भाजपने शिंदे यांची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे.गणेश नाईक यांना मंत्रिपद व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद बहाल करणे,हा त्याचाच एक भाग आहे.गणेश नाईक हे आता ठाण्यात लवकरच जनता दरबार भरवणार आहेत.त्यामुळे शिंदे गट प्रचंड अस्वस्थ झाला आहे.गणेश नाईक यांच्या जनता दरबाराला शिंदे गटाचा तीव्र विरोध असल्याचे स्पष्ट होत आहे.काल एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा व नियोजन समितीच्या बैठकीस वनमंत्री गणेश नाईक यांनी पाठ फिरवली.त्यामुळे येणाऱ्या काळात या दोघांमध्ये जोरदार संघर्ष होण्याची दाट शक्यता आहे.पालघर जिल्ह्यातही शिंदे गटाचे बऱ्यापैकी प्राबल्य आहे.या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे आपल्या कायम विरोधात असलेल्या नाईक यांना देण्यात आल्यामुळे शिंदे नाराज झाले आहेत.२०२९ साली होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मुंबईलगत असलेल्या ठाणे व पालघर जिल्ह्यात शिंदे गटाचे वर्चस्व वाढू नये,यासाठी भाजप आतापासून तयारीला लागला आहे.मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका लक्षात घेऊन महायुतीने दक्षिण मुंबईचे अर्धे पालकमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना दिले आहे.मध्य मुंबईत शिंदे गटाचे बऱ्यापैकी प्राबल्य असल्यामुळे त्यांच्याकडे हे अर्धे पालकमंत्रीपद सोपवण्यात आले.तर उर्वरित अर्धे पालकमंत्री भाजपचे मंगलप्रभात लोढा यांच्याकडे देण्यात आले आहे.
रायगड व नाशिक जिल्ह्यात शिंदे गटाल पालकमंत्रीपद मिळू नये,यासाठी अजित पवार व देवेंद्र फडणवीस या दोघांनी ही दोन्ही मंत्रीपदे आपापसात वाटून घेतली.नाशिक येथे शिंदे गटाचे दादा भुसे तर रायगड येथे भरत गोगावले यांच्याऐवजी भाजपचे गिरीश महाजन व अजित पवार गटाच्या अदिती तटकरे या दोघांची वर्णी लावण्यात आली.या दिन जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून आता तीन पैश्याचा तमाशा रंगला असून दादा भुसे यांनी याप्रश्नी आपला संयम सोडला नाही,पण भरत गोगावले मात्र हाताच्या बाह्या वर करत रायगडच्या रणसंग्रामात उतरले आहेत.सध्या या दोन्ही पालकमंत्रीपदाना फडणवीस यांनी स्थगिती दिली असली तरी अदिती तटकरे व गिरीश महाजन,हे दोघे प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री म्हणून कार्यक्रमास उपस्थित होते.पालकमंत्रीपदाचा हा तिढा देवेंद्र फडणवीस आता कसा सोडवतात ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

