दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
४१ अनधिकृत इमारती ; लोकप्रतिनिधींकडून जुमलेबाजी सुरूच…
नालासोपारा पूर्व भागातील ४१ अनधिकृत इमारतीवरील तोडक कारवाई जवळपास पूर्ण होत आली आहे.या कारवाईनंतर सुमारे दोनशे हुन अधिक कुटुंबाचे संसार उघड्यावर पडले आहेत.कारवाई सुरू होण्यापूर्वी आणि कारवाई सुरू झाल्यानंतरही खासदार व आमदाराकडून आश्वासनाची जुमलेबाजी सुरूच आहे.आज पुन्हा एक नवीन जुमला समोर आला आहे.आज या पीडित रहिवाशांना नवीन आश्वासन देण्यात आले आहे.याप्रकरणी खासदार आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.आज मंत्रीमंडळाची बैठक आहे,या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दिवसभर मुंबईत भरगच्च कार्यक्रम आहेत.त्यामुळे फडणवीस यांची भेट मिळण्याची शक्यता फार कमी आहे.
आणि समजा भेट मिळालीच तर याविषयी ते मुख्यमंत्र्यांना काय सांगणार,कारण तोडक कारवाई आता पूर्ण होत आली आहे.त्या उध्वस्त कुटुंबाचे पुनर्वसन करण्यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींनीकडे काही पर्याय आहेत का ? असल्यास तो त्यांनी तो मुख्यमंत्र्यासमोर मांडायला हवा,पण त्यांच्याकडे तो नसावा,असे स्पष्ट होत आहे.केवळ आश्वासनाची जुमलेबाजी करणे,एवढेच या लोकप्रतिनिधींच्या हाती आहे.तुमच्यावर विश्वास ठेवून हे २०० कुटुंबे निर्धास्त झाली होती.पण निवडणूक संपल्यानंतर या पीडित कुटुंबाना आपल्या लोकप्रतिनिधींचा फसवा फंडा लक्षात आला. निवडणुकीपूर्वी या इमारती तुटू देणार नाही,असे छातीठोकपणे सांगणारे आमदार,आता हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे आम्हाला काही करता येत नाही,असे सांगू लागले आहेत.त्यामुळे या पीडित कुटुंबाचा संताप अनावर झाला आहे.आज या लोकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे जाहीर केले आहे.जर त्यांना भेट मिळाली तर खा.डॉ.हेमंत सवरा व आ.राजन नाईक यांनी या दोनशे कुटुंबांची विरार येथील म्हाडाच्या इमारतीमधील सदनिकामध्ये त्यांची तात्पुरती सोय करावी,अशी मागणी केली पाहिजे.कारण ही कुटुंबे आणखी किती दिवस उघड्यावर आपला संसार थाटतील ?

