दीपक मोहिते,
एसटी सेवा ; सर्वप्रथम वाचवा आणि मग भाडेवाढ करा,
गरिबाची मर्सिडीझ अशी ओळख असलेल्या एसटीची १४.९५ टक्क्याने भाडेवाढ झाली आहे.एकीकडे महिला व वृद्ध प्रवाशांना मोफत प्रवास तर दुसरीकडे प्रचंड भाडेवाढ,सरकारचे हे धोरण सर्वसामान्यांच्या समजण्यापलीकडचे आहे.एसटी सेवा सक्षम होऊच नये,यासाठी आजवर अनेक प्रयत्न झाले.शासनाकर्त्यांच्या या प्रयत्नांना काही अंशी यशही आले.अनेक देशात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था खाजगी वाहतूक व्यवस्थेच्या तुलनेत बळकट असावी,असे प्रयत्न केले जातात.पण आपल्या देशात नेमके उलटे होत आहे.त्यामुळे अनेक राज्यातील एसटी सेवा आज डळमळीत अवस्थेत असलेल्या पाहायला मिळतात.ही सेवा सक्षम होऊ नये,यासाठी राजकीय नेते,खाजगी सेवा देणारे ठेकेदार व सरकारी अधिकारी यांची अभद्र युती झाली आहे.
राज्यसरकारने नुकतीच केलेली भाडेवाढ ही या सेवेची कंबर मोडणारी आहे.गेली अनेक वर्षे व्हेंटिलेटरवर असलेल्या या सेवेत करण्यात आलेली भाडेवाढ,ही या सेवेला थेट स्मशानात नेणारी आहे.
” गाव तेथे एसटी व रस्ता तेथे एसटी,” हे उद्दिष्ट मोडीत काढणारा हा निर्णय असून सरकारने त्याचा फेरविचार करण्याची गरज आहे.एकीकडे खाजगी बसेसचा सर्वत्र सुळसुळाट होणे व दुसरीकडे महामंडळाचा अनागोंदी कारभार,अशा दोन कारणामुळे या सेवेचा डोलारा कोसळण्याच्या स्थितीत आला आहे.आता गावागावात लालपरी ऐवजी काळी-पिवळी,जीप,टेम्पो ट्रॅव्हलर व टमटम यांचा झालेला सुळसुळाट,हा एसटी सेवेच्या मुळावर आला आहे.खाजगी सेवा ही थेट घरापर्यंत तसेच ती कोणत्याही वेळेला उपलब्ध होत असल्यामुळे लोकही या सेवेला पसंती देऊ लागले आहेत.आता नवे परिवहनमंत्री दरवर्षी पाच हजार प्रमाणे येत्या पाच वर्षात २५ हजार एसटी गाड्या खरेदी करणार आहेत.एवढ्या घाईघाईने ही खरेदी का होत आहे,हे तुम्हा-आम्हाला कोणी सांगायला नको.आज महामंडळाची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक बनली आहे.कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होत नाही.दिवसेंदिवस प्रवासीसंख्या कमी होत आहे,त्यामुळे नवीन वाहने खरेदी करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या कर्जाचे हप्ते फेडणार कसे ? या प्रश्नांची उत्तरे सरकारकडे नाहीत. नवनिर्वाचित परिवहनमंत्र्यांनी सर्वप्रथम सेवा सुधारणे,प्रवासी संख्या वाढवणे व वाहतूक विभागाच्या मदतीने बेकायदा प्रवासी वाहतूक रोखणे,अशा तीन स्तरावर काम करायला हवे.तरच ही लालपरी पुन्हा दिमाखात रस्त्यावर धावू लागेल.ही सेवा वाचवण्याचे उद्दिष्ट आपल्यासमोर आहे,ते त्यांनी विसरता कामा नये.तरच या सेवेला पुन्हा सुगीचे दिवस येऊ शकतील.

