-

CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 75? दिपक मोहिते,
अत्यंत विदारक चित्र,
बीड जिल्ह्याचा सांस्कृतिक चेहरा पार काळवंडला गेला,
बीड जिल्ह्याचे सांस्कृतिक व ऐतिहासिक वैभव,हे एकेकाळी डोळे दिपवून टाकणारे होते.आज त्या जिल्ह्याचा बिहार झाल्याची टीका होत आहे.चारी बाजुंनी होणारी ही टीका बिडवासीयांच्या जिव्हारी लागणारी अशीच आहे.ज्या जिल्ह्यात अनेकांची कुलदेवता असणारी योगेश्वरी देवी,वैजनाथाचे मंदिर,मन्मथस्वामी मंदिर,थोर अभ्यासक भास्कराचार्य,आद्यकवी मुकुंदराज,दासोपंत,
भगवानबाबा,अशा संत व गुरु यांचे वास्तव्य असलेल्या ऐतिहासिक व पौराणिक बीड जिल्ह्याचे वैभव राज्यकर्त्यांनी पार धुळीला मिळवले.

भाजपचे नेते प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे या दोघांनी बीड जिल्ह्याला राज्याच्या राजकीय नकाशावर आणले.त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात झाल्यापासून बीड जिल्ह्यात गुन्हेगारीची बीजे रोवली गेली. वाळूतस्करी,खंडणी,हत्या, टोळीयुद्ध,राखेची तस्करी, ऊसतोड कामगारांची पिळवणूक,इ.घटनामध्ये बेसुमार वाढ होत गेली. दुर्देवाने या गुन्हेगारीमध्ये महसूल व पोलीस अधिकारी देखील सामील झाले.त्यामुळे गुन्हेगारीला राजाश्रय मिळत गेला.अनेक गैरप्रकारातून प्रचंड अर्थकारण उभे राहत गेले व बीड जिल्ह्याची जी ओळख सांस्कृतिक व पौराणिक अशी जी होती,ती बदलत गेली.पंकजा मुंडे व धनंजय मुंडे या दोघांनी यावर उपाययोजना करण्याऐवजी खतपाणी घातले व त्यानंतर वाल्मिक कराडसारख्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना राजाश्रय मिळू लागला.आज हा वाल्मिक कराड या दोघांच्या जीवावर फार मोठा झाला आहॆ.आज तो अडचणीत आला असला तरी कालांतराने तो मुंडे बंधू-भगिनीला डोईजड होणार आहॆ.येणाऱ्या काळात त्याचा राजकीय क्षेत्रावर उदय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या दोन वर्षात दिवसागणिक झालेल्या हत्या,खंडणीच्या वाढत्या घटना व त्याला पोलिसांचे मिळणारे संरक्षण,इ.घडामोडीमुळे हा जिल्हा आता ज्वालामुखीवर वसला आहॆ.जिल्ह्याचा सांस्कृतिक चेहरा पार काळवंडला गेला आहे,तो पुन्हा उजळण्याची शक्यता नाही.त्यामुळे हा जिल्हा आता गुन्हेगारीचे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखू लागल्यास आपल्याला आश्चर्य वाटता कामा नये.

