दीपक मोहिते,
७५ वर्षानंतर आम्ही कुठे आहोत ?
आपला देश प्रजासत्ताक होवुन ७५ वर्षाचा काळ लोटला असून यंदाचे हे वर्ष अमृतमहोत्सवी वर्ष आहे.दिवसरात्र मेहनत व अभ्यास करून तयार करण्यात आलेली राज्यघटना आता स्वतःच्या अस्तित्वासाठी धडपडताना दिसू लागली आहे.७५ वर्षांपूर्वी सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदु ठेवून ही घटना तयार करण्यात आली,पण गेल्या सात दशकात हा सर्वसामान्य माणूस हरवला गेला.आपली राज्यघटना ही जगात सर्वात श्रेष्ठ राज्यघटना असून तिचा जगभरात नावलौकिक आहे.आपल्या राज्यघटनेसारखी जगभरात कोणत्याही देशाची इतकी परिपूर्ण राज्यघटना नाही.घटनाकरानी राज्यघटना तयार करण्यासाठी घेतलेली मेहनत खरोख़रच कौतुकास्पद आहे.अठरापगड़ जाती-जमाती,पोटजमाती व विविध धर्माचा समावेश असलेल्या देशातील सर्व वंचित घटकाना न्याय देणे, हे महत्वाचे काम घटनाकारानी रात्रंदिवस खपुन केले,पण आज देशात काय स्थिती आहे?
वंचितांची संख्या गेल्या ७५ वर्षात कमी होण्याऐवजी ती सतत वाढत आहे.सत्तेची सारी सूत्रे मुठभर श्रीमंताच्या हाती गेली,त्यामुळे देशातील ६० % जनता आजही दारिद्र्य रेषेखाली जगत आहे.शिक्षण,आरोग्य,रोजगार क्षेत्रात जे विकासाचे वारे वाहीले,ते केवळ शहरापूरते मर्यादित राहीले.त्यामुळे देशातील लाखो खेडी आजही अंधारात चाचपडत आहेत.या खेड्यातील जनतेच्या आयुष्यात कधीच उष:काल होऊ शकला नाही.कारण,
अमलबजावणी करणाऱ्या राजकारण्यानी ” राज्यघटनेच्या माध्यमातून सु-राज्य,” ही संकल्पनाच मोडीत काढण्याचे काम केले.आज हीच मंडळी आपली राज्यघटना किती महान व आदर्श आहे,याचे गोडवे गात असतात.आज प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहण करुन आपले संविधान किती आदर्श आहे व ते आपणा सर्वासाठी धर्मग्रंथ असल्याचे आपल्या भाषणात आवर्जून सांगतील व आम्ही त्यांच्या प्रत्येक वक्तव्यावर टाळ्या वाजवु.गेली ७५ वर्षे हेच होत आले आहे.उद्या देशभरात प्रजासत्ताकदिन मोठ्या उत्साहात साजरा होईल.त्यानतर मात्र ” पुन्हा ये रे माझ्या मागल्या,”असे हे दुष्टचक्र थांबणार तरी कधी ? १४० कोटी लोकसंख्या असलेल्या देशात १०० कोटी जनता,आज न उद्या आपल्या जीवनात उष:काल होईल,अशा आशेवर जगत आहे.त्यांनी गेल्या ७५ वर्षात अनेक काळरात्री जागून काढल्या आहेत.निदान उष:काल नाही तर पहाट तरी व्हावी,एवढीच त्यांची इच्छा आहे.पण ती कधी पूर्ण होईल,हे सांगणे कठीण आहे.
गेल्या १० वर्षांपासून राज्यघटना मोडीत काढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.त्यासाठी पद्धतशीरपणे प्रयत्न होत आहेत,हे जर प्रयत्न यशस्वी ठरले तर देशाची एकात्मता व अखंडता धोक्यात येऊ शकते.त्यामुळे राज्यघटनेला नख लावण्याचे धाडस कोणी करू नये,देशातील कोट्यवधी जनता ते कदापि सहन करणार नाही.

