दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
अमित शहा यांना शरद पवारांचे एवढे वावडे का ?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग अद्याप मोकळा झाला नसला तरी राजकीय नेत्यांची एकमेकांवर चिखलफेक सुरू झाली आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्रात आले की त्यांना शरद पवार यांच्यावर तोफ डागल्याशिवाय चैन पडत नाही.काल नाशिक येथे एका कार्यक्रमानिमित्त आले असता,त्यांनी आपल्या भाषणात,शरद पवार केंद्रात कृषिमंत्री असताना त्यांनी कृषी व सहकार क्षेत्रासाठी काय केले ? असा प्रश्न विचारत हल्ला चढवला.शरद पवार यांनीही त्यांच्या या टिकेनंतर पलटवार करताना अमित शहा,हे कोल्हापूरचे आहेत,असे वाटत नाही,असा चिमटा काढला.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना शरद पवार यांचे इतके वावडे का ? हा एक संशोधनाचा विषय आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा याचे राज्यातील दौरे वाढले आहेत.राज्यातील विरोधकाना नामशेष करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून त्यांना हद्दपार करण्याचे उद्दिष्ट भाजपने डोळ्यासमोर ठेवले आहे.विरोधकाकडे असलेल्या महानगरपालिका या त्यांना आर्थिक बळ देतात,त्यामुळे हे आर्थिक स्रोत खंडित करण्यासाठी भाजपने विशेष रणनिती आखली आहे.दस्तुरखुद्द अमित शहा हे या रणनितीचे प्रणेते आहेत.त्यामुळे ते आपल्या प्रत्येक दौऱ्यात उद्धव ठाकरे व शरद पवार यांना लक्ष्य करत आहेत.मध्य मुंबईत शिवसेनेचे ( उबाठा ) असलेले वर्चस्व लक्षात घेऊन त्यांनी मुंबई शहराचे पालकमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना बहाल केले आहे.तसेच दक्षिण मुंबईत गुजराती-मारवाडी समाजाचे प्राबल्य लक्षात घेऊन त्यांनी मंगलप्रभात लोढा यांची वर्णी लावली आहे.एकाच शहरात दोन पालकमंत्री,हा आगळावेगळा प्रयोग त्यांनी राबवला आहे.पुणे व इतर महानगरपालिका निवडणुकांमध्येही ते जातीने लक्ष घालत आहेत.या सर्व प्रक्रियेत शरद पवार आपल्याला शह देऊ शकतात,हे लक्षात घेऊन ते वारंवार पवारांना लक्ष्य करत आहेत.कृषी व सहकार क्षेत्राच्या उन्नतीसाठी शरद पवार यांनी आपले उभे आयुष्य खर्ची घातले.ते केंद्रीय कृषीमंत्री असताना आपला देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला.पूर्वी आपल्याला इतर देशातून अन्नधान्य आयात करावे लागत होते,आज आपला देश अन्नधान्य निर्यातदार देश म्हणून नावारूपाला आला आहे,अशी परिस्थिती असताना आज अमित शहा हे शरद पवार यांनी कृषी व सहकार क्षेत्रासाठी काय केले ? अशी विचारणा करत सुटले आहेत.सहकाराच्या माध्यमातून शरद पवार यांनी राबवलेल्या धोरणामुळे ग्रामीण भागातील साखर,दुग्ध व कृषी,या तीन उद्योगांनी राज्याचे अर्थकारण बळकट झाले.पण या वास्तवाकडे दुर्लक्ष करत गृहमंत्री अमित शहा हे नको त्या उचापती करत फिरत आहेत.

