दीपक मोहीते,
” पालकमंत्रीपदाचे गौडबंगाल, ”
पालकमंत्रीपदासाठी मंत्र्यांच्या हाणामाऱ्या कशासाठी ? नेमकं काय दडलंय या पदामध्ये ?
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून जीवघेण्या हाणामाऱ्या सुरू आहेत.या पालकमंत्रीपदात असं काय दडलंय आहे ? ज्यासाठी मंत्री व पक्षाचे ज्येष्ठ नेते एकमेकांच्या उरावर बसत आहेत.चला खोलात शिरून पाहूया,नेमकं काय दडलंय ते….
पालकमंत्री म्हणजे एका जिल्ह्याचा मुख्यमंत्री, जिल्हा विकास नियोजन समितीला मिळणाऱ्या निधीची विल्हेवाट लावण्याचा ठेका,या पालकमंत्रीकडे असतो.हे पद मिळाले की चारी बाजूने पैश्याचा ओघ सुरू होतो.एक पालकमंत्री वर्षभरात कमीतकमी १०० कोटींची माया कमवू शकतो.जिल्हा विकास नियोजन समिती म्हणजे निधी वाटपाचे दुकान असते.ठराविक टक्के द्या आणि आपल्या तालुक्यासाठी निधी मिळवा.मिळालेला निधी कामासाठी वापरा किंवा नका वापरू,कोणी हरीचा लाल तुम्हाला जाब विचारणार नाही.निधी मिळवण्यासाठी जे टक्के द्यावे लागतात,त्याचा दर प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळा असतो.आपण सर्वसामान्य माणसे जे कर देतो,त्या कराची पालकमंत्री,आपला आमदार व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य कशी विल्हेवाट लावतात,हे तुम्हाला आम्हाला कधीच कळत नाही,आणि भविष्यात कळणार देखील नाही.
या दरोडेखोरीत पालकमंत्री जिल्ह्यातील सर्वच आमदार,समिती सदस्य व खासदारांना सहभागी करून घेत असतो.एकप्रकारे ही टोळी म्हणजे ” अलिबाबा आणि चाळीस चोर,” अशीच असते.जिल्हाधिकारी हा या टोळीचा सचिव असतो. त्याच्याच सहीने हा निधी जिल्ह्याच्या तिजोरीतून बाहेर पडत असतो.या टोळीला अडवणारा जिल्हाधिकारी अजूनतरी जन्माला आलेला नाही.कारण तोही या लुटारू टोळीचा एक भाग असतो.याच दरोडेखोरांच्या हातून दरवर्षी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण केले जाते.आणि आपण बावळट नागरिक ठेवणीतील कपडे इस्त्री करून ते घालून या थंडीत कुडकुडत कार्यक्रमाला हजेरी लावत असतो.
आता कळले ना पालकमंत्री बनण्यासाठी मंत्री का रूसवे फुगवे करतात ते…आपले मुख्यमंत्री एवढे रुसले की त्यांनी थेट आपले दरे गावच गाठले.जिल्हा परिषद व महसूल विभागातर्फे करण्यात येणाऱ्या प्रत्येक व्यवहारात या लोकांचे उखळ चांगलेच पांढरे होत असते.विकासकामे न करता कंत्राटदारांची बिले निघतात,या बिलातून ठराविक टक्केवारीची रक्कम अधिकारी,खासदार,
आमदार व जिल्हा नियोजन समिती सदस्यांच्या खिशात जातात.त्यामुळे पालकमंत्री पदासाठी सतत हाणामाऱ्या होत असतात.मंत्री झाल्यानंतर त्या आमदारांची चलती सुरू होते,पण पालकमंत्री पद मिळाले की त्या पालकमंत्र्याची ” पाचो उंगली घीमे,” मध्ये रुतत जातात.त्यामुळे पालकमंत्रीपदाला आता अनन्यसाधारण महत्व आले आहे.वर्षभरात १०० कोटीचा मिळत असेल तर का म्हणून एकमेकांच्या उरावर बसायचे नाही.खरं आहे हे,या मंडळींचे म्हणणे,कारण आम्ही तुम्हाला त्यासाठीच तर निवडून पाठवले आहे.बीड जिल्ह्यात जे काही चाललंय त्याचे सारे गुपित याच पालकमंत्रीपदात दडलंय.आज बीड,उद्या त्याच मार्गावर इतर जिल्हे वाटचाल करू लागले तर तुम्ही-आम्ही आश्चर्य वाटून घेता कामा नये.

