दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
दावोस दौरा : तुमच्या – आमच्या पैश्यावर राज्यकर्त्यांचे पर्यटन,
गेल्या काही वर्षात जगभरातील बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपल्या राज्यात गुंतवणूक करावी,आपले प्रकल्प सुरू करावेत,यासाठी स्वित्झर्लंड या निसर्गरम्य देशातील दावोस येथे जाण्याचे सत्ताधारी पक्षाचे मुख्यमंत्री व उद्योगमंत्री याना सध्या वेडं लागले आहे.त्यांच्या या प्रत्येक दौऱ्यात ४० ते ५० लाख कोटींची गुंतवणुक होणार असल्याचे हे नेते बेंबीच्या देठापासून कोकलत असतात.पण प्रत्यक्षात गेल्या १५ वर्षात किती गुंतवणूक आली,किती उद्योगधंदे सुरू झाले व किती रोजगार निर्मिती झाली ? हा एक संशोधनाचा विषय ठरू शकतो.
आपल्या कार्यकाळात परकीय गुंतवणूक आली,हे दाखवण्यासाठी आपले राज्याचे मुख्यमंत्री व उद्योगमंत्री दरवर्षी तुमच्या आमच्या पैशाने दावोस या नावाजलेल्या पर्यटनस्थळी पर्यटन करत असतात. महाविकास आघाडी सरकारचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे व उद्योगमंत्री सुभाष देसाई हे दोघेही दावोसला जाऊन आले होते,त्यांनीही लाखो कोटींची गुंतवणुक आणल्याची बोंब त्यावेळी ठोकली होती,त्यानंतर महायुतीचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही दावोसच्या पवित्र भूमीला पदस्पर्श केला होता.त्यांनीही लाखो कोटींची गुंतवणूक खेचून आणल्याचा दावा केला होता.आता देवेंद्र फडणवीस आणि उदय सामंत या दोघांनी रेकॉर्डब्रेक गुंतवणूक आणल्याचे ऐकायला मिळत आहे.गेल्या पाच वर्षांत या सगळ्यांनी जेवढी गुंतवणुक मिळवली,ती लक्षात घेता राज्यात उद्योगधंद्याची भाऊगर्दी व्हायला होती.पण या काळात राज्यात एकही प्रकल्प आला नाही.वास्तविक गुंतवणूकीचे जाहीर झालेली आकडेवारी पाहता राज्यातील बेरोजगारी संपून राज्य सुजलाम
सुफलाम व्हायला हवे होते. पण तसे काहीही झालेले नाही. आपले राज्यकर्ते हे तुमच्या आमच्या पैश्याने गुंतवणूक आणण्याच्या बहाण्याने केवळ पर्यटनांची मजा लुटत आहेत. कालांतराने हीच मंडळी राज्यात आलेले उद्योगधंदे केंद्र सरकार दुसऱ्या राज्यात पळवून नेत असल्याचा आरोप करत तुमची-आमची दिशाभूल करण्यात धन्यता मानत असतात.

