दीपक मोहिते,
” चोराच्या उलट्या बोंबा,”
धनंजय मुंडे यांचे ट्विट : ” शैतानाच्या तोंडी बायबल,”
काल राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) पक्षाच्या शिर्डी येथे झालेल्या अधिवेशनाला महाराष्ट्राचे वादग्रस्त मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले.त्यांनी केलेल्या एका ट्विटमधील मजकूर वाचून भल्याभल्यांनी आपल्या कपाळावर हात मारून घेतला.ते आपल्या ट्विटमध्ये काय म्हणाले ते पहा जरा,ते म्हणाले, स्व.संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर झालेला मीडिया ट्रायल,समाजमाध्यमावर झालेली चिखलफेक व काही लोकांनी साधलेले राजकारण,अशा अनेक गोष्टींमुळे जिल्ह्याचे ऐक्य धोक्यात आले आहे.आपला पक्ष हा शिव,शाहू,फुले व आंबेडकर यांच्या विचारावर चालणारा पक्ष आहे.त्यामुळे आता आमच्या बीड जिल्ह्यातील सामाजिक सलोखा जपण्याची जबाबदारी सर्वांना घ्यावी लागेल.ऊसतोड,कष्ट करून कोरडवाहू शेती करून जगणारे आम्ही सामान्य लोक आहोत.आमचा जिल्हा बिहार आणि आमची परळी तालिबानी नाही.अशीच बदनामी सुरू राहिली तर पुढच्या महिन्यात महाशिवरात्री आहे,बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ यांच्या दर्शनाला भाविक येतील का ? अशी भिती वाटू लागली आहे,त्यामुळे परळीची बदनामी थांबवा,असे कळकळीचे आवाहन त्यांनी आपल्या या ट्विटमध्ये केले आहे.
महाशिवरात्री व प्रभू वैद्यनाथ यांच्याआड ते आता लपू पाहत आहेत.परळीची महिती, माहीत असणाऱ्या या नेत्यांच्या टोळक्याने गेल्या सहा ते सात वर्षात जो धुमाकूळ घातला.किड्यामुंग्यांसारखी माणसे मारली.अनेक महिलांचे कुंकू पुसले,त्यांच्या तोंडी ” परळीची बदनामी नको,अशाप्रकारची भाषा शोभत नाही.संतोष देशमुख यांच्या मुलीचा आक्रोश पाहून राज्याच्या जनतेचे काळीज पिळवटून निघत असताना मुंडे म्हणतात, ” आम्ही ऊसतोड,कष्ट करून कोरडवाहू शेती करणारी सामान्य माणसे,” तुमच्यासारखी नराधम माणसे जेंव्हा सामान्य माणसाच्या जीवावर उठतात,त्यावेळी जिल्ह्याची बदनामी होत असते.चारही बाजूने टीकेच्या तोफा धडाडू लागल्यानंतर या मुंडे महाशयांना,आपला पक्ष शिव,शाहू,फुले व आंबेडकरांच्या विचारावर चालणारा पक्ष आहे,अशी उपरती झाली आहे.वरील महान विभूतीची नांवे घेण्याची लायकी नसलेली ही मंडळी आता ” सामाजिक सलोखा जपण्याची,” भाषा करू लागले आहेत.हा प्रकार म्हणजे ” शैतानाच्या तोंडी बायबल,” असेच म्हणावे लागेल.शाहू,फुले,आंबेडकर या थोर महापुरुषांची नांवे तुमच्यासारख्या नराधमाच्या तोंडी शोभून दिसत नाही.ज्या मुलीच्या डोक्यावरून बापाचे छत्र हिरावून घेतले त्यानी निदान सलोखा जपण्याची भाषा करू नये.गेल्या सहा वर्षात अनेक लोकांची हत्या करणारे कोण आहेत,तुम्हाला त्या लोकांचा राजकारणात कसा फायदा होत होता,हे आता लपून राहिलेले नाही.त्यामुळे इमोशनल ब्लॅकमेलिंग करण्याचे प्रकार थांबवा,असेच बीडवासीयांचे म्हणणे आहे.

