दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
महायुतीमध्ये धमासान सुरु झालंय…
महायुतीमध्ये सध्या जे काही सुरू झाले आहे,ते पाहता भावी काळात महायुतीमध्ये काहीही घडू शकते.शिंदे यांचे वारंवार रुसणे व गावी जाऊन बसणे,अशा वागण्यामुळे भाजप देखील आता सर्जिकल स्टाईक करण्याच्या तयारीला लागला आहॆ.त्यासाठी भाजपकडून नवीन उदयाला संधी मिळण्याची शक्यता आहॆ.या सर्व घडामोडीमुळे महायुतीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही आता सोप्या राहिलेल्या नाहीत.शिंदे यांचा रुसवा व महायुतीमधील अज्ञात शक्तीकडून अजित पवार यांची कोंडी करण्याचे होत असलेले जाणीवपूर्वक प्रयत्न,त्यामुळे या दोन्ही गटाचे मंत्री,आमदार,खासदार प्रचंड तणावाखाली आले आहेत.
मुख्यमंत्रीपदाने हुलकावणी दिल्यापासून मंत्रिमंडळात आपल्याला योग्य वाटा न मिळणे,खातेवाटपात झालेला अन्याय व आता पालकमंत्रीपदे वाटप,यामुळे एकनाथ शिंदे यांची अवस्था ” रुसूबाई रुसू,कोपऱ्यात जाऊन बसू,” अशी झाली आहॆ. त्यामुळे सध्या ते आपल्या दरे गावी निवांतपणे विश्रांती घेत आहेत.दुसरीकडे भाजपचे आ.सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरण चांगलेच लावून धरल्यामुळे अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात चांगलीच बदनाम झाली आहे.वाल्मिक कराड व धनंजय मुंडे यांच्या टोळक्याचे कारनामे समोर आणणारे सुरेश धस थांबायचे नाव घेत नाही.ते एवढे मोठे धाडस कोणाची फूस असल्याशिवाय करू शकतील,असे वाटत नाही.धनंजय मुंडे यांच्या टोळक्याचे प्रताप उजेडात आल्यानंतरही अजित पवार त्यांना मंत्रीपदावरून दूर करण्यास तयार नाहीत.त्यांचा हा अट्टाहास त्यांच्या पक्षाच्या विनाशाला कारणीभूत ठरणारा आहे.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारसह ८० % मंत्री,आमदार व खासदार,अनेक प्रकरणात संशियत आहेत.धनंजय मुंडे यांना हटवण्यात आले तर तोच क्रायटेरिया आपल्यासह अनेकांना लागू होईल,अशा भितीमुळे धनंजय मुंडे यांची हकालपट्टी करण्यात येत नाही.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार,छगन भुजबळ,सुनील तटकरे,प्रफुल्ल पटेल,हसन मुश्रीफसह अन्य आमदार,खासदार व पदाधिकारी हे बदनाम
फरीश्ते आहेत.मुंडे यांची हकालपट्टी झाल्यास तीच फुटपट्टी इतर सर्वांना लावावी लागेल,म्हणून मुंडे यांना झुकते माप देण्यात येत आहे.
दुसरीकडे पालकमंत्रीपदावरून भाजप,एकनाथ शिंदे गट व अजित पवार,या तिन्ही घटक पक्षातील मंत्र्यांच्या जीवाची घालमेल सुरू झाली आहे.रायगड,नाशिक व पालघर या तीन ठिकाणी एकनाथ शिंदे गटाची भाजपने चांगलीच गळचेपी केली तर कोल्हापूर व नाशिक या जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असूनही त्यांच्या तोंडाला पाने पुसली गेली.बीड येथे मुंडे यांना पालकमंत्रीपद मिळणार नाही,हे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे या पाण्यात देव टाकून बसल्या होत्या,पण अजित पवार यांनी त्यांना त्यांचे देव बाहेर काढू दिले नाहीत.ही सर्व परिस्थिती लक्षात घेता महायुतीची वाटचाल,ही १९८० च्या काळात जनता पक्षाच्या वाताहतीची आठवण करून देणारी आहॆ.

