दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
अखेर रायगड व नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्त्या रद्द,
काल कर्जत येथे झालेल्या एका कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर तीव्र शब्दात टीकास्त्र सोडले होते.त्यामुळे राजकारण ढवळून निघाले होते. त्यामुळे फडणवीस यांनी काल रातोरात नाशिक व रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या.रायगडच्या अदिती तटकरे व नाशिकचे गिरीश महाजन या दोघांना नारळ देण्यात आला.आता या दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी कोणाच्या नियुक्त्या करण्यात येतात,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रायगड जिल्ह्याच्या राजकारणात सुनील तटकरे कुटुंबीय व भाजप/ शिवसेना ( एकनाथ शिंदे गट ) या महायुतीच्या दोन प्रमुख घटक पक्षाचे विळ्या भोपळ्याचे नाते आहे.नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत तटकरे यांनी महायुतीमधील घटक पक्षाच्या उमेदवारांना पाडण्याचे षडयंत्र रचले होते,असा आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहे.पण भरत गोगावले व अन्य नेत्यांनी तो हाणून पाडला,अशी जिल्ह्यात सर्वत्र चर्चा सुरू आहे.तटकरे यांच्या कारनाम्याचे जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटत होते.दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात झालेल्या कार्यक्रमात भरत गोगावले यांनी ” जनाची नाही तरी,मनाची लाज बाळगा,” अशा शब्दात तटकरे यांना खडेबोल सुनावले होते.महायुतीमध्ये बेबनाव होत असल्याचे पाहून मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्याची दखल घेतली व त्यांनी या दोन्ही जिल्ह्याच्या नियुक्त्या तात्काळ रद्द केल्या.तसेच मालेगाव विधानसभा मतदारसंघातून सतत निवडून येणारे दादा भुसे यांना नाशिकचे पालकमंत्रीपद मिळेल,अशी सर्वसाधारण अटकळ होती.पण मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपले विश्वासू सहकारी गिरीश महाजन यांची वर्णी लावली.त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचंड नाराज झाले होते.अशावेळी भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदावरून जाहीरपणे टीकास्त्र सोडल्यामुळे फडणवीस यांना उपरती झाली व त्यांनी वरील निर्णय घेतला.गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे गट व भाजपमध्ये मंत्रिपद,खातेवाटप व पालकमंत्रीपदे यावरून प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.नाराज असलेले एकनाथ शिंदे हे आपला बराच वेळ आपल्या ” दरे,” या मूळगावी असलेल्या शेतीमध्ये नातवासोबत रमलेले पाहायला मिळतात.तसेच धनंजय मुंडे व वाल्मिक कराड या प्रकरणामुळे सध्या माध्यमापासून दूर आहेत.शिंदे गटातील आमदार,खासदार व पदाधिकारी,हे अजित पवार गटाला फडणवीस यांच्याकडून मिळत असलेल्या झुकते माप पाहून नाराज आहेत.पण आपला नेता पण उठसुठ गावी जाऊन बसत असल्यामुळे हे सर्वजण सध्या तणावाखाली आले आहेत.

