दीपक मोहिते,
” हल्लाबोल,” भाग क्र.१,
चांगली सुरुवात,पण वाटेत अनेक अडचणी व अडथळे,
गेल्या रविवारी बहुजन विकास आघाडीच्या नालासोपारा पूर्व व पश्चिम विभागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्वपुर्ण बैठक झाली.या बैठकीत पक्षाचे नेते व माजी आ.हितेंद्र ठाकूर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.यावेळी आ.ठाकूर यांचा जोश व बॉडीलँग्वेज पाहून उपस्थित कार्यकर्ते चांगलेच सुखावले.त्यांच्या भाषणातील आक्रमकपणा व कार्यकर्त्याविषयी असलेला विश्वास लक्षात घेता,आ.पराभवाने खचून जाणारे नेतृत्व नाही,हे अधोरेखित झाले.त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केलेले विचार,हे ” टायगर अभी जिंदा है,” या वाक्याला जागणारे असेच होते.आक्रमकतेसोबत त्यांनी माझ्याकडूनही चुका झाल्याचे प्रामाणिकपणे कबूल केले व आजही मी त्याच ऊर्जेने काम करत असल्याचे सांगितले.कालच्या या बैठकीने कार्यकर्त्यांमध्ये गरमजोशीचे वातावरण निर्माण झाले आहे.कोणत्याही परिस्थितीत आपल्याला महानगरपालिका निवडणुका जिंकायच्याच आहेत,असे आवाहन करत त्यांनी बैठकीचा समारोप केला.
मात्र,त्यांची ही वाटचाल सोपी नसून अत्यंत खडतर अशी आहे.कारण,पक्षाच्या कार्यप्रणालीमध्ये अनेक अडचणी व त्रुटी आहेत.त्या दूर करणे व पक्षाला वेगळे स्वरूप देण्याची गरज आहे.जुन्या पदाधिकाऱ्यांच्या जागी नवीन चेहरे आणण्याचे धनुष्य त्यांना पेलावे लागणार आहे. वयोमानानुसार जुने पदाधिकारी बदलून त्यांच्या जागी पक्षातील सुशिक्षित तरुणांना संधी मिळाली पाहिजे.तसेच दर दोन महिन्यांनी वसई,नालासोपारा,विरार,
नायगाव व तालुक्याचा ग्रामीण भाग,अशा पाच विभागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका होऊन संघटनात्मक कामाचा आढावा घ्यायला हवा.महानगरपालिका निवडणुका अवघ्या चार महिन्यावर आल्या असल्यामुळे सध्या ते शक्य नाही.पण प्रयत्न करायला हरकत नाही.वेळ कमी असला तरी ते करायला हवं.महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी देताना उमेदवार हा सुशिक्षित,निवडून येण्याची क्षमता,समाजातील त्याचे स्थान,त्याची राजकीय पार्श्वभूमी व परिसर विकासाबाबत असलेली समज,असे निकष लावल्यास त्याचे नक्कीच सकारात्मक परिणाम महानगरपालिका निवडणुकीत पाहायला मिळतील.
दुर्देवाने गेल्या काही वर्षात अनेक नगरसेवक हे एकतर बेनामी ठेकेदार किंवा बेनामी बांधकाम व्यवसायिक होते.त्यांना मतदारांच्या दैनंदिन अडचणी व समस्यांशी काही देणे-घेणे नव्हते.हितेंद्र ठाकूर यांच्या नावाची पट्टी आपल्या कपाळावर लागली की आपण हमखास निवडून येणार,ही त्यांची पात्रता होती.आता तसे होता कामा नये,पूर्वी लोकांसमोर पर्याय नव्हता,त्यामुळे ते चालून जायचे.पण आता तशी परिस्थिती उरलेली नाही.भाजपकडे नरेंद्र मोदी यांच्यासारखा चेहरा आहे.नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्याचा प्रत्यय आला आहे.सशक्त पक्ष व सुशिक्षित उमेदवाराची निवड,अशा दोन स्तरावर काम व्हायला हवे.
महायुतीच्या यशामध्ये केवळ भाजपचे योगदान नाही,तर त्यांची मातृसंघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भरीव कामगिरी आहे.संघ हा साडेचार वर्षे हिंदुत्वाच्या अजेंड्यावर काम करत असतो.मात्र निवडणुकीच्या अगोदर सहा महिन्यात तो सक्रिय होतो.त्यांची काम करण्याची पद्धत ही एखाद्या गुप्तहेर संघटनेसारखी असते.आपल्या देशाची ” रॉ,” गुप्तहेर संघटनेचे काम ज्या पद्धतीने होते,तशीच पद्धत संघाची आहे.ते कधीही प्रकाशझोतात येत नाहीत,पण प्रत्येक मिशन ते यशस्वीपणे पार पाडतात.वसई व नालासोपारा विधानसभा मतदारसंघात त्यांनी अशीच किमया करून दाखवली.ते कधी सक्रिय झाले,याची कानोकान खबर कोणालाच लागली नाही.नालासोपारा मतदारसंघात त्यांनी नकारात्मक प्रचार केला.तो अशा पद्धतीचा होता.” आम्हाला मते दिली नाहीत तरी चालतील,पण ज्यांनी तुम्हाला पुरेसे पाणी दिले नाही,तुमच्यासाठी साधं हॉस्पिटल उभारलं नाही,तुम्हाला दर्जेदार शिक्षण व वैद्यकीय सेवा उपलब्ध केल्या नाहीत.अशांना घाबरून जाऊन मते देऊ नका,त्यांची भिती वाटत असेल तर मतदानाच्या दिवशी घराबाहेर पडू नका.” त्याचा परिणाम मतदानावर झाला व जे पस्तीस वर्षात शक्य होऊ शकलं नाही,ते त्यांना सहजशक्य होऊ शकले.
उलटपक्षी या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचा दमदार प्रचार कुठेच बघायला मिळाला नाही.मतदानाच्या दिवशी अनेक बुथवर पक्षाचे अनेक कार्यकर्ते गायब होते.मतदानाच्या शेवटच्या दोन तासात मतदार घराबाहेर काढणारे कार्यकर्तेही पाहायला मिळाले नाहीत.प्रचारादरम्यान मोजके पदाधिकारी पत्रके वाटताना पाहायला मिळाले.या निवडणुकीच्या प्रचारात पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी झोकून दिले,असे कुठेच दिसले नाही.या सर्व पार्श्वभूमीवर आ.हितेंद्र ठाकूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी महानगरपालिका निवडणुकीत डोळ्यात तेल टाकून प्रचार यंत्रणेवर लक्ष ठेवायला हवे.
क्रमशः

