दीपक मोहिते,
” न्यूजलाईन,”
अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारावे की ” शरद पवार यांचे कृषीक्षेत्रात योगदान किती ?, ”
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा याना कायम ” जळी स्थळी शरद पवार,” दिसत असतात.पवार यांचा अमित शहा याना एवढा धसका का वाटतो,कळेनासे झाले आहे.यापूर्वीही शहा यांनी एका जाहीर सभेत शरद पवार यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले होते.त्यावर पलटवार करताना पवार यांनी ” तडीपार,” अशा भाषेत संभावना करत,त्यांचे तोंड गप्प केले होते.काल त्यांनी पवार यांच्यावर टीका केली,पण ती सौम्य भाषेत होती.त्यांच्या या टीकेला पवार काय उत्तर देतात,हे लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे.
काल अमित शहा यांनी पवार यांच्यावर टीकेची झोड उठवताना,देशाचे कृषीमंत्री व राज्याचे
मुख्यमंत्री म्हणून पवार यांनी आपल्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आपली जबाबदारी पार पाडली नाही,असे खोटे वक्तव्य केले.वास्तविक शरद पवार कृषीमंत्री व डॉ.मनमोहनसिंग पंतप्रधान असताना शेतकऱ्यांना ७३ हजार कोटी रु.ची पहिली कर्जमाफी मिळाली होती.हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात शरद पवार यांचे विशेष योगदान होते.अमित शहा यांनी अशाप्रकारचे बेछुट आरोप करताना आपल्या कारकिर्दीत लाखो शेतकऱ्यांनी केलेले तीन महिन्याचे आंदोलन व त्याच्यावर झालेल्या अत्याचाराची त्यांनी आठवण ठेवायला होती.शेतकऱ्यांना दिल्ली शहरात दाखल होता येऊ नये,यासाठी रस्त्यावर खिळे कोणी ठोकले होते ? शेतकऱ्यांवर पाण्याचे जीवघेणे फवारे कोण मारत होते ? त्यांच्या अंगावर गाड्या कोण घालत होते ? शेतकऱ्यांना राष्ट्रद्रोही कोण ठरवत होते.असो,पण ज्या शरद पवार यांच्यावर त्यांनी टिकेची झोड उठवली,त्या पवारांनी बारामती येथे आपल्या कृषी संशोधन केंद्रात केलेले विविध प्रयोग व प्रकल्पाला भेट देऊन दिवसभर पाहणी करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी विचारायला हवे की पवार यांचे कृषीक्षेत्रात योगदान किती ? केवळ विरोधाला विरोध करत,ज्या व्यक्तीने महाराष्ट्र राज्याच्या उभारणीमध्ये भरीव योगदान देणाऱ्या कृषीक्षेत्रातील ” जाणता राजा,” वर बेछूट आरोप करणे,हा प्रकारच मुळी ” धादांत खोटं बोल,पण रेटून बोल, ” अशा चौकटीत बसणारे आहॆ.अमित शहा यांच्या भाषणात महाराष्ट्र राज्यावरील प्रेम उतू जात होते.महाराष्ट्र अव्वल क्रमांकाचे राज्य असल्याचे ते सांगत होते.पण हे राज्य खिळखिळे करण्यासाठी राज्यातील उद्योगधंदे अन्य राज्यात कोण पळवून नेत आहॆ,कृषीक्षेत्र कॉर्पोरेट सेक्टरच्या घशात घालण्याचे षडयंत्र कोणी रचले होते, या सर्व विषयी शहा यांनी आत्मपरीक्षण करायला हवे.

