दीपक मोहिते,
” बॉटमलाईन,”
आगामी महानगरपालिका निवडणूक ; माजी आ.हितेंद्र ठाकूर यांनी कंबर कसली…
काल शिर्डी येथे झालेल्या भाजपच्या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.येत्या तीन ते चार महिन्यात या निवडणुका होतील,असा अंदाज व्यक्त करत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे,असे आवाहन यावेळी करण्यात आले.विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर विरोधी पक्ष अद्याप सावरलेला नाही.भाजपच्या तयारीच्या तुलनेत विरोधी पक्षाकडून कोणतीही हालचाल दिसत नाही.पण माजी आ.हितेंद्र ठाकूर मात्र त्यास अपवाद ठरले आहेत.या निवडणुका लवकरच होतील,हे गृहीत धरून त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या विभागवार बैठका व मेळावे घेण्यास सुरुवात केली आहॆ.त्यांच्या या प्रयत्नाला कार्यकर्त्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहॆ.त्यामुळे भाजपला ही महानगरपालिका सहजासहजी जिंकता येईल,अशी शक्यता वाटत नाही.
भाजप,या निवडणुका जिंकण्यासाठी जोरदार तयारी करत असताना दुसरीकडे विरोधी पक्षाच्या आघाडीवर मात्र स्मशान शांतता आहे.विधानसभा निवडणुकीत झालेल्या अभूतपूर्व पराभवाने विरोधी पक्षाचे अवसान पार गळून पडल्याचे पाहायला मिळत आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये भाजपचे मुंबई,ठाणे व वसई-विरार,या तीन महानगरपालिका प्रमुख लक्ष्य आहे.मुंबई व ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला रोखण्यात महायुतीला शक्य झाले,तर त्यांच्या आर्थिक नाड्या आवळल्या जातील,हे लक्षात घेऊन भाजप व्युव्हरचना करत आहे.महानगरपालिकेत गेल्या चार वर्षाच्या प्रशासकीय राजवटीमध्ये भाजपला आर्थिक ताकदीचा अंदाज आला.त्यामुळे या महानगरपालिका आपल्या ताब्यात याव्यात,यासाठी भाजपने आता कंबर कसली आहे.वसई – विरार शहर महानगरपालिकेतही अशीच परिस्थिती पाहायला मिळाली.प्रशासकीय काळात महायुतीच्या एका घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घातलेला धुमाकूळ,माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी केलेली लूट व मनपा अधिकाऱ्यांचे गल्लाभरू कारभार,पाहून ही महानगरपालिकाही पोटेंशियल असल्याचे दिसून आले.त्यामुळे भाजपने ही महानगरपालिका आपल्या ताब्यात यावी,यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.दुसरीकडे भाजपच्या हालचाली लक्षात घेऊन बहुजन विकास आघाडीचे सर्वोच्च नेते माजी आ.हितेंद्र ठाकूर हे पूर्ण ताकदीनिशी रिंगणात उतरण्याच्या तयारीला लागले आहेत.विभागवार बैठका व मेळावा घेण्याचे सत्र सुरू झाले आहे.तसेच विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्यामुळे पक्षात फेरबदल होण्याचेही संकेत मिळत आहेत.तसेच पराभवानंतर खचून गेलेल्या कार्यकर्त्यांना रिचार्ज करण्याच्या प्रक्रियेला चांगलाच वेग आला आहे.त्याचे सकारात्मक परिणाम या निवडणुकीत नक्कीच पाहायला मिळतील,असे वाटते.

