दीपक मोहिते,
राजकारण,
दिल्ली विधानसभा : भाजप – आपमध्ये अटीतटीची लढाई,काँग्रेस लढणार स्वतःच्या अस्तित्वासाठी…
केंद्रात आपले सरकार असूनही गेल्या दहा वर्षांपासून देशाची राजधानी दिल्ली आपल्याकडे नाही,हे शल्य पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा या दोघांना आहे.त्यामुळे पुढच्या महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूक २०२४,वर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.या निवडणुकीच्या तोंडावर इंडिया आघाडीमध्ये बिघाडी निर्माण झाली असून काँग्रेस पक्ष ही निवडणूक स्वबळावर लढणार आहे.आपचे अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसशी समझोता करण्यास साफ नकार दिला आहे.हे दोन्ही पक्ष आता स्वबळावर रिंगणात उतरल्यामुळे भाजपला मतविभागणीचा त्याचा फायदा मिळू शकतो.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत सुमारे एकूण १ कोटी ५५ लाख मतदार असून ते आपल्या हक्काचे ७० लोकप्रतिनिधी निवडणार आहेत.५ फेब्रु.२०२५ रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षाने सर्वच्या सर्व ७० जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत.तर भाजपने २९ उमेदवाराची पहिली यादी जाहीर केली आहे.काँग्रेसनेही आतापर्यंत २१ उमेदवार जाहीर केले आहेत.
या निवडणुकीची मतमोजणी ८ फेब्रु.रोजी होणार आहे.भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जरी रिंगणात असली तरी खरी लढत भाजप व आप,या दोघांमध्ये होईल,असा अंदाज आहे.गेल्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने ७० पैकी ६३ जागा जिंकून भाजपला धूळ चारली होती.भाजपला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले.तर काँग्रेस पक्षाची पाटी कोरी राहिली.या निवडणुकीत त्यांच्या ६३ जागांवरील उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने दिल्लीतील सातही जागा जिंकल्यामुळे भाजप या विधानसभा निवडणुकीत दिल्ली काबीज करण्याच्या प्रयत्नाला लागला आहे.तर दिल्लीची ही लढत काँग्रेस अस्तित्वासाठी लढेल,असे स्पष्ट होत आहे.दुसरीकडे आम आदमी पक्षाने गेल्या पाच वर्षात मोहल्ला क्लिनिक,अद्ययावत सरकारी शाळा,वीज व पाणी बिलात सवलती,इ.योजना राबवून सत्तेचा गड शाबूत ठेवला आहॆ.आता ही निवडणूक जिंकण्यासाठी ” लाडली बहना,” योजना सुरू करण्याचे जाहीर केले आहे.गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अनेक विकासकामाचे उदघाटन करण्याचा धुमधडाका लावला आहे.या निवडणुकीत भाजप व आम आदमी पक्ष या दोघांमध्ये अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहॆ.मद्यधोरणात झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल,मनिष सिसोदीया या दोघांना जेलची हवा खायला लागली होती.त्यामुळे या दोघांना आपापल्या पदाचे राजीनामे द्यावे लागले होते.या सर्व घडामोडीमुळे राजकारणात नवख्या असलेल्या आतिषी यांचे नशीब फळफळले व त्या सध्या मुख्यमंत्रीपदी विराजमान आहेत.

