दीपक मोहिते,
मंथन,
अजून वेळ गेलेली नाही,…
आज एक अत्यंत महत्वाचा तसेच वसई – विरारकरांसाठी ज्वलंत असलेला विषय,मी या ब्लॉगमध्ये हाताळणार आहे.विषय तसा संवेदनशील आहेच,पण तो वसईच्या नागरिकांसाठी देखील जिव्हाळ्याचा असा आहे.त्यामुळे मलाही या विषयावर लिहिताना खूप विचार करून लिहावा लागत आहे.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसई-विरार उपप्रदेशात ज्या काही राजकीय उलथापालथी झाल्या,त्या नक्कीच सगळ्यासाठी वेदनादायक ठरल्या.गेली तीस ते पस्तीस वर्षे बहुजन विकास आघाडीच्या अबाधित असलेल्या साम्राज्याला सुरुंग लागला.गेल्या पस्तीस वर्षात बलाढ्य भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेनेला आ.हितेंद्र ठाकूर यांचा गड भेदता आला नाही.डॉमनिक गोंसालवीस,दीपक गव्हाणकर,मनवेल तुस्कानो,विवेक पंडित,प्रदीप शर्मा,यांना जे शक्य झाले नाही,ते राजकारणात नवख्या असलेल्या स्नेहा दुबे व राजन नाईक यांना ते शक्य झाले.ते कशामुळे शक्य झाले ? याविषयी चिंतन व्हायला हवे.आजवर जातीपाती – धर्माच्या राजकारणाला थारा न देणारे वसईकर सर्वधर्मसमभावाला सोडचिठ्ठी देत हिंदुत्वाला जवळ कसे करू शकतात ? हा खरा प्रश्न आहे.याचे उत्तर आहे,गेल्या काही वर्षात या उपप्रदेशात वेगाने झालेले प्रचंड नागरीकरण होय.बाहेरून येथे स्थायिक होणाऱ्या नागरिकांची संख्या ही स्थानिक भूमीपुत्रापेक्षा कित्येक पटीने वाढत गेली व स्थानिक हे अल्पसंख्यांक झाले.बाहेरून स्थायिक झालेले परप्रांतीय व मुंबईतील नागरिक हे विशिष्ट दोन पक्षांना मानणारे आहेत,त्या दोन्ही पक्षाचा मूळ पाया हा हिंदुत्व आहे.वाढते नागरीकरण व हिंदुत्वाचे देशभरात पसरलेले वादळ याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे बहुजन विकास आघाडीला या निवडणुकीत खूप काही गमवावे लागले.
दुसरे महत्वाचे कारण म्हणजे राज्यात ठाकरे,पवार,मुंडे या कुटुंबाला जसे मतभेदाचे तडे गेले,त्याच धर्तीवर ठाकूर – पाटील कुटुंबातील दोन भावाची मने एकमेकांपासून दुरावत गेली व होत्याचे नव्हते झाले.आघाडीचे क्रमांक दोनचे नेते राजीव पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार,अशा स्वरूपाच्या बातम्या निवडणुकीच्या तोंडावर झळकल्या व सर्वत्र चर्चेला उधाण आले.अनेक युट्युब चॅनेलवाल्यानी अतिरंजित बातम्या व्हायरल केल्या.त्यामुळे आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संभ्रमावस्था निर्माण झाली.त्याचवेळी अनेक कार्यकर्त्यांनी ” मी आप्पासोबत,” अशा जाहिराती सोशल मीडियावर झळकवल्यामुळे गोंधळात अधिक भर पडली.प्रत्येक जण नक्की काय चाललय ? याचा शोध घेऊ लागला.” राजू पाटील हे भाजपमध्ये जाणार,” यामध्ये किती तथ्य होते,ते देवजाणे,पण या बातमीने विरोधकासाठी खूप काही साध्य झाले.त्यावेळी मी ” हे चहाच्या पेल्यातील वादळ असून ते लवकरच शमणार,” अशी पोस्ट व्हायरल केली होती,आणि घडलही तसच.पण तोवर पुलाखालून बरचसं पाणी वाहून गेले होते.ते पुन्हा माघारी फिरेल,अशी शक्यता नव्हती.वास्तविक त्यावेळी हितेंद्र ठाकूर व राजीव पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ” हम सब साथ साथ है,” असे संकेत दिले असते तर विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे चित्र वेगळे पाहायला मिळाले असते.गेल्या काही वर्षात राजकीय मतभेदांमुळे ठाकरे,पवार व मुंडे कुटुंबाना खूप काही सोसावे लागले.कुटुंबे फोडण्यात कोण तरबेज आहे,जगजाहीर असताना हे दोघे भाऊ कसे गाफील राहिले,याचे आश्चर्य वाटते.गोपीनाथ मुंडे,उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्यावर जशी पाळी आली,तीच पाळी आज ठाकूर व पाटील कुटुंबावर आली आहे.अजूनही वेळ गेलेली नाही,हितेंद्र ठाकूर व राजीव पाटील,यांनी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संयुक्त मेळावे घेणे,सुरू करावेत.या दोघांना एकत्र पाहून पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नक्कीच उत्साह संचारेल व त्याचे दृष्यपरिणाम महानगरपालिका निवडणुकीच्या निकालात पाहायला मिळतील.

