दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
फोडाफोडीच्या राजकारणाला पुन्हा ऊत येणार…
राष्ट्रीय स्तरावरील विरोधकांची इंडिया आघाडी व महाराष्ट्रात महाविकास आघाडी,या दोघांचे भवितव्य आता जवळपास अंधारात सापडले आहे.महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक झाल्यानंतर भाजपने ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद हिरावून घेतले,ते लक्षात घेता बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार सावध झाले आहेत.
कारण बिहार राज्याच्या विधानसभा निवडणुका लवकरच होऊ घातल्या आहेत.ही निवडणूक नितीशकुमार हे भाजप सोबत लढतील,असे वाटत नाही.नितीश कुमार यांनी जर एनडीए पासून फारकत घेतली तर केंद्र सरकारकडे काठावरचे बहुमत राहील.त्यामुळे भाजप आता शरद पवार गटाचे खासदार गळाला लावण्याच्या प्रयत्नात आहे.दुसरीकडे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू हे देखील भाजपने लोकसभा निवडणुका झाल्यानंतर आखलेल्या रणनितीमुळे सध्या अस्वस्थ आहेत.वक्फ बोर्डाच्या जमिनी व एक देश,एक निवडणूक,या दोन विषयावर त्यांचे भाजपशी तीव्र स्वरूपाचे मतभेद निर्माण झाले आहेत.या दोघांनी जर वेगळा विचार केला तर केंद्रातील मोदी सरकारला धोका निर्माण होऊ शकतो.त्यामुळे भाजप आता ” मिशन लोटस,” पुन्हा हाती घेण्याच्या तयारीला लागले आहे.त्यासाठी त्यांनी महाराष्ट्रात अजित पवार यांना कुरवाळण्यास सुरुवात केली आहे.अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल,या दोघांना कामाला लावले आहे.
तसेच जम्मू – काश्मीर विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर भाजपने नॅशनल कॉन्फरन्स पक्षबाबत मवाळ धोरण स्विकारले असल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे आता इंडिया आघाडी बरखास्त करा,अशी मागणी करू लागले आहेत.उद्धव ठाकरे हे देखील आता इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत.भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला सतत पाण्यात पाहणाऱ्या आम आदमी पार्टीला दिल्ली राज्याच्या निवडणुकीत त्यांनी पाठिंबा देऊ केला आहे.या सर्व घडामोडी लक्षात घेता तसेच दोन्ही आघाड्या आता विस्कळीत होत आहेत,हे लक्षात घेऊन भाजप पुन्हा फोडाफोडीच्या राजकारणाला हवा देण्याच्या तयारीत आहेत.अजित पवार गटालाही केंद्रात एखादे कॅबिनेट मंत्रिपद हवंच आहे.त्यांचे प्रफुल्ल पटेल,हे त्यासाठी देव पाण्यात टाकून बसले आहेत.

