दीपक मोहिते,
राज – का – रण ?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ; राजकीय हालचालींना वेग,
वसई-विरार शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाच्या हालचाली व जुळवाजुळवीच्या कामांना सुरुवात झाली आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला रोखण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट ) यांनीही हालचाली सुरू केल्या आहेत.भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा एक बडा नेता नुकताच वसई – विरारच्या दौऱ्यावर येऊन गेला.या दौऱ्यात या नेत्याने एका बड्या नेत्याची भेट घेऊन चर्चा केल्याचे समजते.
गेली चार वर्षे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घेण्याच्या दृष्टीने केंद्रीय निवडणूक आयोग कामाला लागले आहे.येत्या २२ जाने.रोजी सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी होत आहे.या सुनावणी दरम्यान संबधित खंडपीठ,या निवडणुका घेण्यासंदर्भात अंतरिम आदेश देण्याची शक्यता आहे.साधारणपणे या निवडणुका मार्च किंवा एप्रिल महिन्यात होतील,असा अंदाज आहे.नुकत्याच पार पडलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व यश मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.ठाणे महानगरपालिका वगळता मुंबई,वसई – विरार व नवी मुंबई,या तीन महानगरपालिका निवडणुकीत भाजप पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे.ठाणे,कल्याण – डोंबिवली,भिवंडी-निजामपूर,मीरा-भाईंदर,कुळगाव- बदलापूर,उल्हासनगर व अंबरनाथ येथे मात्र त्यांना एकनाथ शिंदे गटाला ३० ते ४० % जागा सोडाव्या लागतील.ठाणे व मुंबई जिल्ह्यात अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष औषधालाही नसल्यामुळे ते या दोन जिल्ह्याच्या निवडणुकीत सहसा पडत नाहीत.मुंबई शहरात भाजप,शिंदे गटाला २५ % जागा देतील.त्याहून जास्त जागा मिळाव्यात,यासाठी शिंदे गटाचा आग्रह जरी असला तरी,त्यांना त्या मिळणार नाहीत.मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेण्याचे प्रयत्न चालवले आहेत.
महायुतीचा घटक पक्ष म्हणून मनसे रिंगणात उतरला तर उद्धव ठाकरे यांच्या सेनेला चांगलाच फटका बसू शकतो.त्यामुळे भाजपने राज ठाकरे यांच्याशी बोलणी सुरू केली आहेत.या निवडणुक प्रक्रियेची संपूर्ण जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे,त्या आ.आशिष शेलार यांनी दोनच दिवसापूर्वी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली.ठाणे व मुंबई येथे उद्धव ठाकरे आणि वसई-विरार महानगरपालिकेत माजी आ.हितेंद्र ठाकूर यांच्या साम्राज्याला सुरुंग लावण्यासाठी भाजपने रणनिती आखली आहे.दुसरीकडे उद्धव ठाकरे,हे या निवडणुका स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहेत.२०१९ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी करत राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग करणाऱ्या उद्धव ठाकरे यांची लोकसभा व विधानसभा निवडणुकीत चांगलीच पीछेहाट झाली.लोकसभा निवडणुकीत त्यांचे झंझावाती दौरे व घणाघाती भाषणामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला बऱ्यापैकी संजीवनी मिळाली.पण स्वतःच्या पक्षाची मात्र प्रचंड पीछेहाट झाली.त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत तर आघाडीच्या या तिन्ही पक्षाचा अक्षरशः पालापाचोळा झाला.त्यामुळे अनेक आमदार,खासदार,नेते उपनेते व पराभूत उमेदवारांनी उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला हवे,असा निर्वाणीचा सल्ला दिला.त्यामुळे उद्धव ठाकरे हे आता ” एकला चलो रे,” च्या भूमिकेत आले आहेत.वसई-विरार शहरात भाजप हे आ.हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला सहजासहजी रोखू शकत नाहीत.लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असला तरी महानगरपालिका त्यांच्याकडून खेचून घेणे सहजशक्य नाही.त्यामुळे भाजप,आघाडीचे नाराज पदाधिकारी,कार्यकर्ते व नगरसेवक याना आपलेसे करण्याचे प्रयत्न करतील.सध्या त्यांनी ज्या भागात आघाडीचे वर्चस्व आहे,त्या भागातील तरुणांना पक्षात प्रवेश देण्याचे सत्र आरंभले आहे.गेल्या आठवड्यात जूचंद्र व नालासोपारा येथील २५० ते ३०० तरुणांना पक्षात प्रवेश दिला.हे तरुण कोणत्याही राजकीय पक्षाशी संबधित नाहीत,पण अशाप्रकारचा प्रवेश,हा दबावतंत्राचा भाग असतो,तो त्यांनी आता सुरू केला आहे.भाजप,वसई तालुक्यातील आचोळे, माणिकपूर,नायगाव,वसई गाव,अर्नाळा,पेल्हार,
तूळींज,कामण व विरार पूर्व ( मनवेलपाडा,कारगिल नगर,सहकारनगर,संतनगर ) या परिसरावर लक्ष केंद्रित करत आहे.त्यासाठी नवनिर्वाचित आमदार,खासदार या भागातील पाणीपुरवठा व्यवस्थेवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.तसेच अधूनमधून महानगरपालिका प्रशासकीय कामकाजाचा आ.नाईक व आ.स्नेहा दुबे-पंडित घेत आहेत.

