दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
ईव्हीएमचे रडगाणं बंद करून कामाला लागा…
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा ईव्हीएम मशीनचा प्रश्न ऐरणीवर आला होता.विरोधी पक्ष ईव्हीएम मशीनच्या विश्वासार्हतेवर वारंवार संशय व्यक्त करत होते.अखेर काल मुख्य निवडणूक आयुक्तांनी या विषयी बाळगलेले आपले मौन अखेर सोडले.या प्रणालीमध्ये चुकीचे काही नसून ही व्यवस्था अत्यंत पारदर्शक असल्याचा निर्वाळा दिला.या विषयी आयोगाची भूमिका स्पष्ट करताना मुख्य निवडणुक आयुक्तानी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा हवाला दिला.निवडणूक आयोगाने याविषयी विरोधकांच्या सर्व आक्षेपावर सविस्तर विवेचन केले असले तरीही अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत.त्या प्रश्नांची उत्तरे मिळतील,अशी अपेक्षा करणे,आता व्यर्थ आहे.याविषयी संशयाचे जे ढग पसरले आहेत,ते लवकर नाहीसे होतील,असेही वाटत नाही.
असो,पण या निवडणुकीत लागलेले अनेक निकाल हे धक्कादायक असेच होते. वर्षानुवर्षे निवडणुका जिंकत आलेले उमेदवार देखील आडवे झाल्यामुळे सर्वत्र संशयाचे धुकं निर्माण झाले. या निवडणुकीत ज्या उमेदवारांना तिकिटे नाकारण्यात आली व त्यांनी बंडखोरी केली,अशा अशा तीन डझन उमेदवारांवर पराभूत होण्याची नामुष्की आली.त्यामध्ये हिना गावित,समीर भुजबळ,कमल व्यवहारे,आबा बागुल,मनोज शिंदे,ययाती नाईक,मनीष आनंद,प्रवीण माने,दिगंबर दुर्गुडे,बापू भेगडे,आशा बुचके,अतुल देशमुख,किरण पाटील,गीता जैन,गायत्री शिंगणे,ज्योती मेटे,तौफिक शेख,राजा ठाकूर,अमोल देशमुख,याज्ञवल्य जिचकार,चंद्रपाल चौकसे, प्रमोद घरडे,नरेंद्र जिचकार,शोभा बनशेट्टी,राहुल जगताप,अंबरीश अत्राम,प्रकाश निकम,हेमलता पाटील,शरद सोनावणे,प्रिती बंड, संभाजी झेंडे व शिवाजी पाटील व अन्य चार, उमेदवारांचा समावेश आहे.तर राजकीय पक्षाचे तसेच काही दिग्गज अपक्ष उमेदवारांनाही पराभवाला सामोरे जावे लागले.त्यामध्ये बाळासाहेब थोरात,पृथ्वीराज चव्हाण,अमित ठाकरे,झिशान सिद्दीकी,यशोमती ठाकूर,बाळासाहेब पाटील,शहाजीबापू पाटील,केदार दिघे,युगेंद्र पवार,कैलाश गोरंट्याल,भावना गवळी,राजेश टोपे,मिलिंद देवरा,इम्तियाज जलील, विशाल बरबटे नबाब मलिक,मेहबूब शेख,बाळा नांदगावकर या १८ उमेदवारांचा तर बच्चू कडू व हितेंद्र ठाकूर यांचा समावेश आहे.
यशोमती ठाकूर,पृथ्वीराज चव्हाण,बाळासाहेब थोरात,राजेश टोपे,समीर भुजबळ,बाळा नांदगावकर, बच्चू कडू व हितेंद्र ठाकूर या दिग्गज उमेदवारांचे पराभूत होणे,विस्मयजनकच होते.पराभवाच्या या धक्यातून अनेक जण अद्याप सावरलेले नाहीत.त्यांच्या या पराभवामागे अनेक कारणे आहेत.त्यावर या मंडळींनी कठोर आत्मपरीक्षण करायला हवे,अन्यथा भाजपचा हा झंजावात असाच पसरत जाणार आहॆ व या वावटळीत अनेक राजकीय पक्षाचा पालापाचोळा होईल.या सर्वांनी इव्हीएमचे रडगाणं बंद करून आता कामाला लागणे गरजेचे आहॆ,अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थामध्येही विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता आहॆ.

