दीपक मोहिते,
राजकीय विश्लेषण,
भाजप जगात सर्वाधिक सदस्यसंख्या असलेला राजकीय पक्ष,
भाजप हा आता जगात सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.या पक्षाची सदस्य संख्या प्रचंड असून गेल्या बारा वर्षात या पक्षाचा विस्तार हा मनुष्यबळ,आर्थिक बळ व आक्रमक धोरण,इ. कारणामुळे होत गेला.आज या पक्षाकडे असलेली ताकद इतर कोणत्याही पक्षाकडे नाही.
भारतीय समाज हा रूढी,परंपरा व जाती-धर्माबाबत अत्यंत संवेदनशील आहे,हे ओळखून भाजपचे तत्कालीन वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी १९८० च्या दशकात स्विकारलेल्या गांधीवादाला मूठमाती देत,यांनी हिंदुत्वाला फुंकर घातली.तत्कालीन विश्वनाथप्रतापसिंग यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी स्विकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजपने ” मंडल विरुद्ध कमंडलू,” असे युद्ध छेडले.” राममंदिर हम वही बनाएंगे,” ही गगनभेदी गर्जना भारताच्या आसमंतात घुमू लागली.देशाचे राजकारण ढवळून निघाल्यानंतर हिंदुत्वाला चांगलीच धार आली.अडवाणी यांची रथयात्रा बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी अडवल्यानंतर तसेच बाबरी कोसळल्यानंतर देशभरात सर्वत्र अशांततेचे वातावरण निर्माण झाले.हिंदुत्वाचे वारे जोमाने वाहू लागले,त्याचे कालांतराने वादळात रूपांतर झाले.पण एवढे महाभारत घडल्यानंतरही भाजपला एकहाती सत्ता मिळू शकली नाही.अनेक पक्षाचे कडबोळे तयार करून त्यांना सरकार बनवता आले,पण सोबत असलेल्या घटक पक्षाला सांभाळून घेत प्रचंड कसरती कराव्या लागत होत्या.अशाही परिस्थितीत सत्तेच्या जवळ जाणे,शक्य होत नव्हते.दुसरीकडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,हा पक्ष भाजपच्या हिंदुत्वाच्या रेट्यापुढे पूर्णपणे हतबल झाला होता.अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी,हे दोघेही भाजपमध्ये मवाळ नेते म्हणून ओळखले जात असत.लालकृष्ण अडवाणी हे काही प्रमाणात आक्रमक होते,पण अटलबिहारी वाजपेयी,यांनी हिंसाचार व दंगली इ.अनिष्ट प्रकाराला कधीच थारा दिला नाही.
अखेर २०१३ मध्ये झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात विद्यमान नेतृत्व हे पक्षाला निवडणूक जिंकून देण्यासाठी सक्षम नाही,हे लक्षात घेऊन पक्षाला आक्रमक चेहऱ्यांची गरज आहे,असा ठराव संमत करण्यात आला व वाजपेयी/अडवाणी यांच्या राजकारणाची इतिश्री झाली.त्यावेळी गुजरात राज्यात काँग्रेसचे पानिपत करणाऱ्या मुख्यमंत्री नरेंद्र दामोदर मोदी,या कट्टर संघाच्या स्वयंसेवकाचे नाव सगळ्यांच्या डोळ्यासमोर आले.आगामी निवडणुकीत पक्षाचा चेहरा म्हणून नरेंद्र मोदी यांचा अशाप्रकारे राष्ट्रीय क्षितिजावर उदय झाला.२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड यश मिळवले व भाजपचा वेलू अल्पावधीत वेगाने गगनावर पोहोचला.त्यांनी आखलेल्या रणनितीमध्ये त्यांचे कट्टर समर्थक व जिवलग मित्र अमित शहा यांनी त्यांना मोलाची साथ दिली.मोदी-शहा यांचा अश्वमेघ घोडा रोखण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येऊन मोट बांधली,पण या दोघांना रोखणे त्यांना शक्य झाले नाही.काँग्रेसचे अल्पसंख्याकांचे तुष्टीकरणाच्या राजकारणाचा भारतीय जनतेत प्रचंड तिटकारा असल्याचे पाहून या दोघानी हिंदुत्वाची मशाल सतत पेटत राहील,याची कायम काळजी घेतली.मोदी यांनी सत्तेच्या पहिल्या पाच वर्षात संवेदनशील विषयांना हात घातला नाही.मात्र दुसऱ्या सत्रात त्यांनी राममंदिर उभारणी,३७० कलम हटवणे,समान नागरी कायदा,नागरिक सुधारणा कायदा,इ.महत्वाचे विषय हाताळले.या सत्रात त्यांनी उद्योगपतींना दिलेले झुकते माप,त्यांची कर्जमाफी,सार्वजनिक उपक्रम उद्योगपतींच्या घश्यात घालणे,शेतमालाला हमी भाव न देणे,महागाईवर नियंत्रण न आणणे व जीवनावश्यक वस्तूंवर भरमसाठ जीएसटी लावणे,इ.कारणामुळे त्यांनी पाहिलेले ” अबकी बार चारसो पार,” हे स्वप्न दोनशे चाळीसवर अडकले.या सर्व घडामोडी घडत असताना या दोघांनी पक्ष मात्र सर्वच बाबतीत मजबूत केला.आज त्यांच्या पक्षाची सदस्य संख्या अनेक कोटीच्या घरात पोहोचली आहे.उद्योगपतींना देण्यात आलेली कर्जमाफी व सार्वजनिक उपक्रमाची त्यांनी वाटलेली खिरापत,या बळावर त्यांनी पक्षाला प्रचंड आर्थिक निधी मिळवून दिला.या निधीचा वापर त्यांनी विरोधी पक्षाचे खासदार / आमदार फोडण्यासाठी केला.त्याचे सकारात्मक परिणाम देखील पाहायला मिळाले.महाराष्ट्र,मध्यप्रदेश,गोवा,हरियाणा,ही त्याची उत्तम उदाहरणे होय.आता महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी ते सज्ज झाले आहेत.या निवडणुकीतही ते फोडाफोडीच्या राजकारणाला हवा देतील.या निवडणुका जिंकण्यासाठी ते कोणत्याही थराला जातील, कारण स्थानिक स्वराज्य संस्था या सोन्याची अंडी देणाऱ्या आहेत.

