दीपक मोहिते,
वास्तव,
पत्रकार दिन ; ख़ुशी कम,ज्यादा गम,
आज साजरा होत असलेल्या पत्रकार दिनावर सध्या मंदी,क्षेत्रातील गैरप्रकार व मोठ्याप्रमाणात असलेल्या भितीचे सावट इ.कारणामुळे हा दिवस आपल्याला अत्यंत साधेपणाने साजरा करावा लागत आहे.कारण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्या क्षेत्राची गेली अनेक दशके ओळख होती,तो स्तंभ आता इतिहासाजमा होत आहॆ. स्वातंत्र्यपूर्व काळात नावारूपाला आलेल्या ” आदर्श पत्रकारिते, ” चे ” गोदी मीडिया, ” असे नामकरण कधी झाले,ते कळले देखील नाही.असो,पण आज पत्रकारदिना निमित्त पत्रकारांना हार्दिक शुभेच्छा…
” पत्रकारिता, ” ही एक समाजहितासाठी आवश्यक असलेली सेवा आहे,पण गेल्या काही वर्षात तीचे स्वरूप बदलत गेले व सेवेचे रूपांतर व्यवसायात होत गेले.त्यामुळे या सेवा क्षेत्राला पार उतरती कळा लागली.स्वातंत्र्य लढ्यात वर्तमानपत्राचे फार मोठे योगदान होते,पण आज हा व्यवसाय संपल्यात जमा आहे.
गेल्या ७५ वर्षात देशाची लोकसंख्या जशी प्रचंड प्रमाणात वाढत गेली,तशी वर्तमानपत्रांची लोकसंख्याही वाढली,त्यातून निर्माण झाली ” जीवघेणी स्पर्धा,…” या स्पर्धेत अनेक वर्तमानपत्रांनी अखेरच्या घटका मोजल्या.जी काही वर्तमानपत्रे टिकली,त्यांना पत्रकारितेच्या मूळ उद्देशाला वेसण घालत व्यवसायाला वेगळे स्वरूप देणे भाग पडले.सन १९९० पासून प्रचंड मंदीच्या वावटळीमध्ये सापडलेल्या वर्तमानपत्रांना,पुढील तीन दशकात सावरता आले नाही.कारण उद्योग व व्यापार क्षेत्राला या काळात उभारी मिळू शकली नाही.परिणामतः जाहिरातीच्या माध्यमातून उपलब्ध होणारे आर्थिक स्त्रोत,या मंदीच्या लाटेत नाहीसे झाले.याच सुमारास लोकांना विविध समाज माध्यमे उपलब्ध होत गेली.व्हाटसअप,फेसबुक
,युट्युब,ट्विटर,इंस्टाग्राम,याचा त्यामध्ये समावेश आहे.
ई – पेपरमुळे तर पेपरविक्री व्यवसायाचे कंबरडे पार मोडून पडले.वर्तमानपत्रे ही सकाळी आठच्या सुमारास आपल्या घरात येत असत,तर ई – पेपर,पहाटे ३.०० वाजता नेटवर उपलब्ध होतो.मग पदरमोड करून पेपर विकत कोण घेणार ? तसेच लाईनवरील पेपर विक्री,या लाटेत नाहीशी झाली.त्यामुळे वर्तमानपत्राचा खप आता २५ % वर आला आहे.अंकविक्रीतून वृत्तपत्र समूहाला कोणताही नफा होत नाही.या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या महसुलातून मालक आपल्या कर्मचाऱ्यांचे साधे वेतन देऊ शकत नाही.अशा परिस्थितीमध्ये अंकखपच उतरणी लागल्यामुळे वृत्तपत्र समूहाचाही नाईलाज झाला व नोकर कपात,वेतनवाढ न देणे,दोन ते तीन कर्मचाऱ्यांचे काम,एकाच कर्मचाऱ्यांकडून करून घेणे,असे प्रकार सुरू झाले.एकीकडे मंदी तर दुसरीकडे आर्थिक स्रोत आटणे,अशा कोंडीत हा व्यवसाय सापडला असताना चार वर्षांपूर्वी आदळलेल्या कोरोनाने तर व्यवसायाचा पायाच उखडून टाकला.त्यामुळे या व्यवसायाचे भवितव्य आता अंधारात सापडले आहे.
अशा परिस्थितीत आपण आज पत्रकार दिन साजरा करत आहोत.आपले भवितव्य अंधारात सापडले असताना हा दिवस आपण आनंदात कसा साजरा करू शकू ? अर्थात ” नाहीच,”
त्यामुळे पत्रकारांनी आता ही स्थिती लक्षात घेतली पाहिजे..
” खुदको खुश
रखनेके अलग तरीके खोजो,”
” वरना,तकलीफें तो आपको
खोजही रही हैं..!”

