दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
पराभवाला बाप नसतो,
विजयाला अनेक बाप असतात,पण पराभव हा कायम पोरका असतो.पराभवातून शहाणपण येत असते,असं म्हंटलं जातं.पण हल्ली पराभवातून शहाणं होण्यास कोणी तयार नाही.विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर अनेक राजकीय पक्षात सध्या जे काही घडत आहे,ते पाहता पराभवाला बाप नसतो,हेच खरं असंच म्हणावं लागेल.सेनेचे राजापूर विधानसभेचे पराभूत उमेदवार राजन साळवी व उद्धव ठाकरे या दोघांमध्ये रंगलेला कलगीतुरा खूप काही सांगून गेला.साळवी यांनी आपल्या पराभवाची कारणमिमांसा करताना, ” माझ्या पराभवाला संजय राऊत व माजी खासदार विनायक राऊत,हे दोघे जबाबदार, ” असल्याचा आरोप केला.त्यानंतर साळवी व ठाकरे या दोघांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला.झालेल्या पराभवाची जबाबदारी,ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी समजून प्रत्येकाने ती स्विकारायला हवी.पण तसं होत नाही.ही जबाबदारी स्विकारून एकत्रितपणे आत्मपरीक्षण करण्याची गरज असते.पराभवाचे पातक आपल्या माथी नको,असा प्रत्येकाचा प्रयत्न असतो.
आपला पराभव का झाला ? त्यामागची कारणे काय आहेत ? याचा शोध घेऊन जो पुन्हा कामाला लागतो,तोच पुन्हा यशाची पायरी चढतो. अनेक मतदारसंघात ज्यांनी कधीच पराभव पाहीले नाहीत, अशा दिग्गज उमेदवारांचे झालेले पराभव,हे राजकीय पक्षांना अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारे आहेत.त्यामध्ये बाळासाहेब थोरात,पृथ्वीराज चव्हाण, हितेंद्र ठाकूर,यशोमती ठाकूर, बच्चू कडू,धीरज देशमुख, संजय काका पाटील,यांचा समावेश आहॆ.विशेष म्हणजे सलग आठ वेळा विजयी होणारे बाळासाहेब थोरात व सहावेळा विजयी होणारे हितेंद्र ठाकूर यांचे झालेले पराभव,हे जिव्हारी लागणारे आहेत.
मात्र या पराभवाचे विश्लेषण व आत्मपरीक्षण न करता त्यांचे सहकारी एकमेकांवर चिखलफेक करण्यात धन्यता मानत आहेत.सत्ताधारी पक्ष विजयानंतर आपल्याला नेस्तनाबूत करण्यासाठी ” ऑपरेशन लोटस, ” राबवण्याच्या तयारीत असूनही आपण जागे होत नाही, ही खऱ्या अर्थाने दुर्देवाची बाब आहॆ.त्याची चुणूक काल वसई विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळाली.काल माजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये जुचंद्र गावातील अनेक तरुण – तरुणीनी भाजपमध्ये प्रवेश केला.त्यानंतर बविआच्या अनेक पदाधिकाऱ्याकडून व्यक्त झालेल्या प्रतिक्रिया आश्चर्य वाटावे,अशाच होत्या. ” हे आमचे कार्यकर्ते नव्हते,” असे त्यांचे म्हणणे आहॆ.ठीक आहॆ,पण ज्याने हे घडवून आणले,तो पक्षाचा माजी कार्यकर्ता होता.हे मात्र ते सोयीस्करपणे विसरतात.
कराड येथे अनेक आपले अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपचा गडगंज श्रीमंत असलेल्या उमेदवारांच्या कधी नादी लागले,हे पृथ्वीराज चव्हाणांनाही कळले नाही. आज येथेही पराभवाचे खापर एकमेकांवर फोडण्यात येत आहॆ.संगमनेर विधानसभा निवडणुकीपूर्वी जी दंगल झाली,जाळपोळीच्या घटना घडल्या व पडापाडीसाठी पैश्याच्या नद्या वाहल्या.” तुम्ही आमच्या सुजयला पाडलात, त्याची परतफेड आम्ही विधानसभा निवडणुकीत केली.” हे कारण असले तरी,या सगळ्यांच्या पराभवाला,पक्ष बांधणीकडे झालेले दुर्लक्ष,सर्वसामान्य लोकांशी तुटलेला संवाद,पदाधिकारी व कार्यकर्ते,यांच्यामध्ये निर्माण झालेली दरी,ही देखील कारणे आहेत.दिग्गज नेत्यांचे हे जे पराभव झाले आहेत,त्याला केवळ उमेदवारच नाही तर पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्तेही तेवढेच जबाबदार आहेत.पदाधिकारी,नाहीतर तळागाळातला कार्यकर्ता हाच पक्षाचा कणा असतो,याचा जेंव्हा विसर पडतो तेंव्हा पराभव,हा आपल्या घराच्या दारावर टक टक करू लागतो,हे आपण लक्षात घ्यायला हवे.अन्यथा पराभवाचा बाप कितीही शोधण्याचा प्रयत्न केला,तरी तो तुम्हाला सापडणार नाही.

