दीपक मोहिते,
संतोष देशमुखांच्या लेकरांना न्याय मिळवून देणे,सरकारची नैतिक जबाबदारी,
संतोष देशमुख यांच्या हत्येमधील आरोपी एकामागोमाग पोलिसांना सापडू लागले आहेत.त्यामुळे पोलिसांच्या विश्वासार्हतेवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.हे सर्व आरोपी पुण्यात सापडल्यामुळे त्यांना आश्रय कोणी दिला ? आणि प्रदीर्घ काळ ते पोलिसांना का सापडू शकले नाहीत.या दोन प्रश्नांची उत्तरे सरकारच्या गृहविभागाने द्यायला हवीत.कारण हे सर्व आरोपी एकाच शहरात सापडतात,याचा अर्थ काय व कसा लावायचा ? वास्तविक बीड जिल्हा हा कृषिप्रधान जिल्हा,जिल्ह्यात गेली अनेक वर्षे पाण्याचा कायम दुष्काळ असतानाही बीडच्या शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून शेती/बागायती फुलवली.त्या जमिनीत गुन्हेगारीची पाळंमुळं कधी रुजली,हे खुद्द बिडवासीयांना कळले देखील नाही.संतोष देशमुख,हा कोणत्या जातीचा होता,यापेक्षा संकटात असलेल्या आपल्या लोकांच्या मदतीला धावून जाणारा एक आदर्श तरुण होता.त्याच्या सेवाभावी वृत्तीने तो पंचक्रोशीत नावारूपाला आला होता.या हत्येतील महत्वाचे आरोपी सापडले असले तरी एक आरोपी अद्याप फरार आहे.मात्र या प्रकरणातील आरोपी ज्या पद्धतीने पोलिसांना सापडत गेले,त्यावरून सर्वत्र संशयकल्लोळ निर्माण झाला आहे.गुन्ह्यातील उमेदवारांना हुडकून काढण्यासंदर्भात महाराष्ट्र पोलिस हे देशात क्रमांक एकवर आहेत.मग पुण्यात आश्रयाला असलेले आरोपी पोलिसांना का सापडू शकले नाहीत.पुण्याचे गुन्हे अन्वेषण विभाग,या काळात भाकऱ्या भाजण्याचे काम करत होते का ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व धनंजय मुंडे यांची भेट झाल्यानंतर अवघ्या २४ तासात वाल्मिक कराड स्वतः आलिशान वाहनातून पुणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या कार्यालयात हजर होतो.त्यानंतर इतर दोन आरोपी देखील त्याच पुणे शहरात पोलिसांना सापडतात.या दोन्ही घटना लक्षात घेता,या सर्वांना ” पोलिसांकडे हजर व्हा,” असे फर्मान सोडण्यात आले असावे,असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.तो चुकीचा नाही.कारण आग लागल्याशिवाय धूर बाहेर पडत नाही.या सर्व घडामोडी घडण्यामागे नक्की कोणती अज्ञात शक्ती सक्रिय होती,हे लोकांसमोर आले पाहिजे.
असो,या हत्येतील आरोपींना अटक झाली असली तरी त्यांच्यावर आरोपपत्र ( चार्जशीट ) दाखल करताना पोलिसांवर बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे.आरोपींना फायदा व्हावा,यासाठी आरोपपत्रात त्यांच्यावर जी कलमे लावण्यात येतात,ती त्यांना फायदेशीर ठरावित, यासाठी सरकारी वकील,तपास अधिकारी व आरोपीचे वकिल यांची मिलीभगत होत असते.या प्रकरणात तसं घडेल,असे वाटत नाही,पण तसं घडलं तर मात्र आगडोंब उसळेल.या प्रकरणात गृहविभाग व विधी खात्याच्या अधिकाऱ्यांवर विशेष जबाबदारी असून संतोष देशमुख यांच्या लेकरांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी दक्ष राहण्याची गरज आहे.या प्रकरणातील आरोपी सहीसलामत बाहेर येता कामा नयेत,ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे.सरकार ती पार पाडेल,अशी अपेक्षा आहे.

