दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
आता हितेंद्र ठाकुराना लवकरात लवकर भाकरी फिरवावी लागणार आहे…
कालच्या राज – का – रण ? या शीर्षकाखाली आपण राजकारणाच्या सद्यःस्थितीवर प्रकाश टाकला होता.आज आपण ” अस का घडलं ? व त्यामागची नेमकी कारणे आहेत ? ” या दोन प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत.कालच्या माझ्या लेखाला वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला.अनेकांना लेख आवडला,त्यामुळे आज दुसरा भाग लिहिण्याचे धाडस मी करत आहे.
वसई तालुका हा एकेकाळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता.अनेक वर्षे वर्तक घराण्याचे या तालुक्यावर निर्विवाद वर्चस्व राहीले.ते वर्चस्व १९८० पर्यंत अबाधित राहिले.त्यानंतर समाजवाद्यांनी तो भेदला,पण तो त्यांच्या हातून निसटला व वसईच्या क्षितिजावर एक उदयोन्मुख तरुण नेतृत्व उभे राहिले.१९९० मध्ये आ.हितेंद्र ठाकूर,हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेवर निवडून आले व काँग्रेसला पुन्हा सुगीचे दिवस आले.पण ते अल्पकाळ टिकू शकले.१९९५ मध्ये हितेंद्र ठाकूर यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिट्ठी देत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली.ही निवडणूक महाराष्ट्राच्या इतिहासात ” न भूतो न भविष्यती,” अशी झाली.आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या.विरोधकांनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करत रान उठवून दिल्यामुळे तत्कालीन निवडणूक आयुक्त स्व.टी. के.शेषन हे परिस्थितीची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आले होते.मतमोजणी पूर्ण करताना आयोगाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रचंड अग्निदिव्यातून जावे लागले होते.अशा बिकट परिस्थितीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेल्या हितेंद्र ठाकूर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत विरोधकांना वसईच्या मातीत गाडले.त्यानंतर हितेंद्र पर्व सुरू झाले ते २००९ पर्यंत अबाधित राहिले.काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते आ.ठाकूर यांच्या वसई विकास मंडळात सहभागी होत गेले.बबनशेठ नाईक,जॉन आल्मेडा व अन्य ज्येष्ठ नेते यांचा त्यामध्ये समावेश होता.आ.ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली असंख्य ग्रामपंचायती,पंचायत समिती,कृषी उत्पन्न बाजार समिती,सहकारी संस्था,बँका,पतसंस्था,नगरपरिषदा,महानगरपालिकायावर निर्विवाद वर्चस्व मिळवले.आ.ठाकूर यांची ही घोडदौड रोखण्यासाठी विरोधी पक्ष शिल्लकच राहिला नाही.२००९ साली मतदारसंघाच्या फेररचनेत
अनेक मतदारसंघ वाढले व वसई विकास मंडळ याचे नामकरण करण्यात आले.बहुजन विकास आघाडी या नावाने आ.ठाकूर यांची राजकीय वाटचाल सुरू झाली.अल्पावधीत त्यांच्या यशाची दखल राज्यस्तरावर घेण्यास सुरुवात झाली.राजकीय पक्षात असताना वरिष्ठांच्या जीवघेण्या स्पर्धेत आपल्याला भोगावे लागल्यामुळे आ.ठाकूर यांनी ” सत्तेत जो पक्ष असेल,तो माझा,” ही भूमिका स्विकारत राजकीय खेळी खेळण्यास सुरुवात केली.त्यामुळे राज्यस्तरावर ते तीन आमदाराच्या जोरावर दबावगट निर्माण करू शकले.त्यांच्या तीन मतासाठी राजकीय पक्षाचे अनेक नेते त्यांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवू लागले.वसई तालुका व हितेंद्र ठाकूर हे समीकरण तयार झाले.२००९ सालचा अपवाद वगळता आ.हितेंद्र ठाकूर यांनी मागे वळून पाहिले नाही.अशी परिस्थिती असताना गेल्या पाच वर्षात असं काय घडलं,की या विधानसभा निवडणुकीत त्यांना मतदारांनी जबर दणका दिला.
चला,तर बघूया गेल्या पाच वर्षात पुलाखालून प्रचंड वेगाने पाणी कसं वाहून गेले ? गेल्या पाच वर्षात आ.ठाकूर यांची तळागाळातील कार्यकर्त्यांशी असलेली नाळ तुटत गेली.त्यांच्या अवतीभवती असणारे नेते व पदाधिकाऱ्यांनी या कार्यकर्त्यांना कधीही विश्वासात घेतले नाही,त्यांची साधी विचारपूस केली नाही.केवळ आपला आर्थिक फायदा,हे एकमेव उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हे लोक त्यांच्या अवतीभवती कायम घुटमळत होते.हे कार्यकर्ते थेट ठाकूर यांना भेटले कि या व्यवसायिक नेत्यांचे पित्त खवळत असे.त्याला बोलावून थेट ” कायरे स्वतःला शहाणा समजतोस का ? थेट आप्पाला जाऊन भेटतोस,” असा सज्जड दम देत असत.त्यामुळे कार्यकर्त्यांची आपल्या या आवडत्या नेत्याशी असलेली नाळ तुटत गेली.गेल्या दहा वर्षात अनेक नगरसेवक व नेते मंडळी गब्बर होत गेले,मात्र तळागाळातील कार्यकर्ते हे मोठे होऊ शकले नाहीत.नालासोपारा पश्चिम भागात पक्षाची धुरा,हे एका नवख्या तरुणांकडे सोपवण्यात आली,आणि त्या तरुणाने अनेक नगरसेवक व कार्यकर्त्यांना हिडीस फिडीस वागणूक दिली आणि पुढचे रामायण घडले.या निवडणुकीत मतदानाच्या दिवशी अनेक नगरसेवक व कार्यकर्ते बुथमधून गायब झाले होते.अशीच परिस्थिती विरार पूर्व भागात पाहायला मिळाली.पूर्वी मतदानाच्या दिवशी दुपारी २.०० नंतर मतदारांना घराबाहेर काढण्यासाठी कार्यकर्त्यांच्या झुंडीच्या झुंडी रस्त्यावर उतरलेल्या पाहायला मिळत असत,यंदा ते चित्र पाहायला मिळाले नाही.बोईसर विधानसभा मतदारसंघात तर याहून भयावह परिस्थिती पाहायला मिळाली.आमदार फंडातील कामे ठराविक दोन व्यक्तींना मिळत राहिल्यामुळे येथील कार्यकर्त्यांनी धोबीपछाड दिला.ही कामे या दोन व्यक्तीच्या माध्यमातून करणारी व्यक्ती कोण होती ? याचा शोध आ.ठाकूर यांनी शोध घेतला तर आपल्या पाठीमागे काय घडत होते,हे नक्कीच कळू शकेल.पाणी हा लोकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न,पण गेल्या पाच वर्षात पाण्याचे ज्या पद्धतीने नियोजन करण्यात आले.अनेक भागांनाआठवड्यातून दोन दिवस पाणी दिले जात होते.यामध्ये कोण आपले उखळ पांढरे करत होते.हे पाहायला हवे होते.वर्षानुवर्षे पाणीपुरवठा विभागाची जबाबदारी एका ठराविक नेत्याकडे सोपावल्यामुळे व्यवस्थेचा अक्षरशः बट्याबोळ होत गेला.त्याचा जबर फटका या निवडणुकीत बसला.लोकांच्या दैनंदिन समस्या व अडचणी,लक्षात न घेता कारभार झाल्यामुळे मतदार दुरावत गेला.त्यास सर्वस्वी अवतीभवती वावरणारे पदाधिकारी जबाबदार आहेत.आजही कार्यकर्ते हितेंद्र ठाकूर यांचा झालेला पराभव,हा अत्यंत क्लेशकारक आहे,असे सांगत आहेत.जे काही घडलं ते घडले,पण त्यांनी आता ज्यांच्यामागे पाच कार्यकर्ते नाहीत,अशांना दूर केले पाहिजे,तरच परिस्थिती सुधारू शकते.आ.ठाकूर यांनी महानगरपालिका निवडणुकीपूर्वी भाकरी फिरवली नाही तर विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.त्यासाठी त्यांनी या मंडळींना बाजूला सारून थेट कार्यकर्त्यांशी संवाद साधायला हवा.हा संवाद होत असताना या पदाधिकारी व नेत्यांना मात्र बोलावता कामा नये. तरच कार्यकर्त्यांच्या तोंडातून खरी परिस्थिती तुम्हाला ऐकायला मिळेल.पण हे सोपस्कार लवकरात लवकर व्हायला हवेत.कारण आजपर्यंत लोकांकडे पर्याय नव्हता, तो भाजपच्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे.

