दीपक मोहिते,
खा.डॉ.हेमंत सवरा यांना अनावृत्त पत्र,
भाग २,
खा.सवरा यांनी शिवधनुष्य पेलावे,जिल्हावासियांकडून माफक अपेक्षा,
पालघर जिल्ह्यात वर्षानुवर्षे विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.त्यामध्ये प्रामुख्याने मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुरावस्था व झालेले अनेक भीषण अपघात,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची याविषयी असलेली अनास्था,गेल्या तीस वर्षांपासून अडगळीत पडलेला डहाणू – नाशिक रेल्वे प्रकल्प,सध्या सुरु असलेल्या मुंबई – वडोदरा द्रुतगती मार्ग व बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये भूमिपुत्रांच्या जमिनी संपादन करताना झालेले गैरप्रकार व जमिनीचा मोबदला मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची महसूल विभागाकडून होणारी पिळवणूक,इ.महत्वाच्या समस्यांचा समावेश आहे.खासदार या नात्याने डॉ.हेमंत सवरा यांनी जटील समस्याचा पाठपुरावा करणे,आवश्यक ठरते.
या व्यतिरिक्त पालघर जिल्ह्यात आदिवासी शेतकरी ज्या वनजमिनी गेली अनेक वर्षे कसत आहेत,त्या जमिनीचे वनपट्टे त्यांच्या नांवावर करण्यासंदर्भात महसूल व वनविभागाकडून विभागाकडून होणारी चालढकल,अशा कारणामुळे अनेक आदिवासी शेतकऱ्यांच्या डोक्यावर गेली अनेक वर्षे टांगती तलवार आहे.या ज्वलंत प्रश्नी या दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांचे कान टोचण्याची गरज आहे.कारण भूमाफिया व चाळमाफियासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी रान मोकळे सोडले आहे. गेल्या काही वर्षात पालघर जिल्ह्यात वनविभागाची हजारो हेक्टर जमीन अनधिकृत बांधकाम व्यवसायिकांच्या घश्यात गेल्या आहेत.या सर्व गैरप्रकाराची चौकशी केल्यास वनविभागाचा फार मोठा जमीन घोटाळा बाहेर येऊ शकतो.निर्ढावलेले शासकीय अधिकारी,राजकीय नेते व भूमाफिया यांच्या मिलीभगतमुळे हे सारे घडत आहे.आपल्या जिल्ह्यात नैसर्गिक संसाधनांची होणारी लूट,आता मानवी जीवनाच्या मुळावर येऊ लागली आहे.ती वेळीच रोखण्यात आली नाही,तर येणाऱ्या काळात नैसर्गिक संसाधनाने नटलेला निसर्गरम्य जिल्हा उजाड माळरान होण्याची शक्यता आहे.
शेजारी असलेल्या ठाणे व नाशिक जिल्ह्याच्या तुलनेत आपल्या जिल्ह्याच्या विकासाचा वेग फार कमी आहे.विक्रमगड,जव्हार व मोखाडा,हे तालुके अतिग्रामीण तालुके म्हणून ओळखले जातात.या तिन्ही तालुक्यात गेल्या ६५ वर्षात उद्योग,व्यापार व कुटीर उद्योगाला चालना मिळू शकली नाही.दळणवळणाची पुरेशी साधने नसल्यामुळे या भागात कारखानदारी निर्माण होऊ शकली नाही.तत्कालीन खा.चिंतामण वनगा यांनी आपल्या कार्यकाळात डहाणू – नाशिक महत्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागावा,यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले.पण मृदू स्वभाव असलेल्या वनगा यांना त्यांच्याच नेत्यांनी गांभीर्याने घेतले नाही.तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली.पण रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी हा प्रकल्प फायदेशीर ठरणार नाही,असे मत नोंदवल्यानंतर हा प्रकल्प बासनात गुंडाळला गेला.या या रेल्वेमार्गाचा सर्व्हे होऊन सुमारे ५० कोटी रु. चा निधी पण खर्च करण्यात आला.पण रेल्वे अधिकाऱ्यांच्या लालफितीच्या कारभारापायी तो गेली अनेक वर्षे रखडत गेला.हा प्रकल्प जर मार्गी लागला असता तर या भागात उद्योगधंदे आले असते व काही अंशी रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असत्या व वर्षानुवर्षे अविकसित असलेला हा परिसर विकासाच्या वाटेवर मार्गस्थ होऊ शकला असता,पण त्यानंतर निवडून आलेल्या खासदारानी या ज्वलंत समस्यांची दखल घेतली नाही.त्यामुळे आता तुम्ही या सर्व समस्यांची दखल घ्या,आणि वर्षानुवर्षे खितपत पडलेल्या या रखडलेल्या समस्या मार्गी लावा. हे शिवधनुष्य तुम्हाला पेलावे लागणार आहे,एक सुशिक्षित लोकप्रतिनिधी म्हणून जिल्हावासियांची तुमच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
क्रमश :

