दीपक मोहिते,
खा.हेमंत सवरा याना अनावृत्त पत्र,
भाग क्र.१
पालघरवासीयांना तुमच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत….
लोकसभा निवडणूका होऊन जवळपास सात महिन्याचा काळ लोटला असून ” नव्या नवरीची नऊ दिवसाची नवलाई,” आता ओसरली आहे.पालघर लोकसभा निवडणुकीत पालघरवासीयांनी खा.डॉ. हेमंत सवरा यांना प्रचंड मताधिक्याने विजयी केले होते.त्या पालघरवासीयांच्या खा.सवरा यांच्याकडून जिल्हा विकासाबाबत फार नाही,पण माफक अपेक्षा आहेत.यापूर्वीही चिंतामण वनगा,बळीराम जाधव व राजेंद्र गावित,हे येथून खासदार म्हणून निवडून गेले होते.पण या तिघांच्या काळात जिल्हा कात टाकू शकला नाही.गेली अनेक वर्षे विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.ते मार्गी लावण्याच्या दृष्टीने या तिघांच्या काळात फारसे प्रयत्न झाले नाहीत.त्यामुळे तुमच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत.
पालघर जिल्ह्याच्या विकासाचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत.ते का सुटू शकले नाहीत,हा एक वेगळा विषय आहे.त्यावर मी पुढे सविस्तर लिहिणार आहेच.तूर्तास जे प्रश्न पालघरवासीयांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहेत,त्यावर प्रकाश टाकणार आहे.
गेल्याआठवड्यात वेळीच वैद्यकीय उपचार न मिळालेल्या एका आदिवासी गरोदर महिलेला आपला जीव गमवावा लागला.वास्तविक या घटनेनंतर खा.डॉ.हेमंत सवरा यांनी त्या महिलेच्या नातेवाईकांची भेट घेणे आवश्यक होते.तसेच या घटनेबाबत जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारायला हवा होता.पण त्यादृष्टीने काहीही झाले नाही.आज पालघर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा मृत्यूशय्येवर आहे,असं म्हंटल्यास ते वावगं ठरू नये,अशी भयावह स्थिती,या जिल्ह्यात बघायला मिळते.गेल्या सात महिन्याच्या काळात अतिग्रामीण भागातील आदिवासी पाड्यावर किती बालमृत्यू झाले,याविषयी पेशाने डॉक्टर असलेल्या खा.सवरा यांनी माहिती घेणे गरजेचे आहे.कुपोषित बालकांची संख्या कमी होण्याऐवजी सतत वाढत आहे,त्यामागची कारणे काय आहेत ? त्याचा शोध खा.हेमंत सवरा यांनी डॉक्टर या नेत्याने घ्यायला हवा.याविषयी जिल्हा आरोग्य यंत्रणा जी काही आकडेवारी जाहीर करते,ती तद्दन खोटी असते.त्यामुळे त्या आकडेवारीवर विश्वास न ठेवता त्यांनी पाड्यापाड्यावर असलेल्या अंगणवाड्याकडून माहिती मागवायला हवी.
तसेच ग्रामीण भागातील हजारो आदिवासी पाड्यावर गेली अनेक वर्षे चालायला धड रस्ते नाहीत,त्यामुळे एसटी,रुग्णवाहिका गावपाड्यावर येजा करू शकत नाही.या अशा पाड्यावर राहणाऱ्या आदिवासींना केवळ पायवाटांचाच आधार आहे.आपण एकविसाव्या शतकात डिजिटल इंडिया,मेक इन इंडिया व सबका साथ,सबका विकास,च्या माध्यमातून जगात महाशक्ती होण्याची स्वप्ने पाहतो,मग मुंबई सारख्या शहराला लागून असलेल्या या जिल्ह्यात ही अशी दुरवस्था का ? रस्ते नसल्यामुळे गावात एसटी सेवा नाही,त्यामुळे अनेक आदिवासी मुले शिक्षणापासून वंचित राहतात,निरक्षरतेचे प्रमाण कमी होण्याऐवजी ते सतत वाढत चालले आहे.शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.आदिवासी समाजातील मुलांना शहरी भागात जाऊन उच्च माध्यमिक शिक्षण घेण्याचा अधिकार नाहीत का ? संविधानाने दिलेला ” शिक्षणाचा अधिकार,” त्यांना नाही का ? या प्रश्नाच्या खोलात जाऊन डॉ. हेमंत सवरा यांनी आता कामाला सुरुवात करावी,अशी पालघरवासीयांची अपेक्षा आहे.केवळ मंत्र्यांना निवेदने देऊन प्रलंबित विकासकामे मार्गी लागणार नाहीत,तर त्यासाठी शर्टाच्या बाह्या वर करत रणांगणात उतरावे लागते.आम्हाला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत.कारण,तुम्हाला लहानपणापासून समाजसेवेचे बाळकडू मिळाले आहे,आणि पेशाने तुम्ही डॉक्टर आहात,आणि डॉक्टरांना नेमकी शस्त्रक्रिया कुठे करायची ? हे ठाऊक असते.
( क्रमशः )

