दीपक मोहिते,
बांगलादेशी घुसखोरांचा वेळीच बंदोबस्त करा,
बांगला देशात सध्या ज्या काही घडामोडी घडत आहेत,त्याचा थेट परिणाम भारतावर जाणवू लागला आहे.शेख हसीना यांचे सरकार पदच्युत झाल्यानंतर त्या देशात अराजकाची परिस्थिती निर्माण झाली आहे.हजारो बांगला देशी नागरिक आपल्या सीमेवर जमा होत आहेत.त्यामुळे आपल्या सीमा सुरक्षा दलाने सीमेवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यास सुरुवात केली आहे.असे असतानाही अनेक बांगलादेशी नागरिक आपल्या देशात घुसखोरी करण्यात यशस्वी ठरत आहेत.
या घडामोडीमुळे आपल्या सीमारेषेवर तैनात असलेली सुरक्षायंत्रणा ही प्रभावी नसल्याचे दिसून आले आहे.सीमाभागांमध्ये परकीय नागरिक पैसे देऊन घुसखोरी करत असतात.हे बांगलादेशी घुसखोर आपल्या देशात घुसखोरी करून वेगवेगळ्या राज्यात आपले बस्तान बसवतात.

अशा या घुसखोरांना आपल्या देशात आधारकार्ड,रेशनकार्ड,पॅनकार्ड अगदी सहजरित्या मिळतात.ते उपलब्ध करण्यासाठी अनेक टोळ्या देशभरात कार्यरत आहेत. अनेक शहरातील बांगलादेशी घुसखोर आणि त्यांना मदत करणाऱ्या टोळ्यांच्या विरोधात सरकारने मोहीम उघडली असली तरी ती अद्याप प्रभावी ठरू शकलेली नाही.नुकतेच दिल्ली शहरात घुसखोरांची भारतीय ओळखपत्रे बनवणार्या एका मोठ्या टोळीला जेरबंद करण्यात पोलीस यंत्रणेला यश मिळाले.या टोळीत आधारकार्ड ऑपरेटर आणि तांत्रिक तज्ञ यांचाही समावेश आहे.सध्या दिल्ली हे बांगलादेशी घुसखोरांसाठी माहेरघर बनले आहे.बांगलादेशातून भारतात आलेले घुसखोर सीमा ओलांडल्यावर दिल्ली गाठतात.त्यांना दिल्लीत स्थायिक होण्यासाठी अनेक टोळ्या सक्रिय आहेत.या घुसखोरांना तेथे स्थायिक होण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे या टोळ्या बनवून देत असतात.या टोळीमध्ये आणखी किती जण सहभागी आहेत ? आणि त्यांच्या कारवायांची व्याप्ती किती मोठी आहे ? याविषयी पोलीस सध्या तपास करत आहेत.भारतीय नागरिकांना आधारकार्ड किंवा रेशनकार्ड मिळवण्यासाठी अनेक कागदपत्रे जोडावी लागतात.त्यांना ते मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते.असे असतांना बांगलादेशी घुसखोरांना ही कागदपत्रे इतक्या सहजपणे कशी काय मिळू शकतात ? पुणे येथे एका रोहिंग्याने तर थेट घर बांधले असून तो येथे गेले अनेक महिने निर्धास्तपणे राहत होता. झारखंड राज्यामधील काही जिल्ह्यांमध्ये लोकसंख्येपेक्षा अधिक आधारकार्ड असल्याचे आढळले आहे.अलीकडेच झारखंडमधील निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाला मोठे यश मिळाले होते.या यशामध्ये बांगलादेशी घुसखोरांचा मोठा वाटा आहे,असा तपास यंत्रणांना संशय आहे.झारखंड, बंगाल,दिल्ली व अन्य काही राज्यांमध्ये राजकारणावर थेट परिणाम करण्याची क्षमता,या बांगलादेशी घुसखोरांनी निर्माण केली आहे.सुरक्षायंत्रणांनी सादर केलेल्या अनेक अहवालांमध्ये हे बांगलादेशी घुसखोर भारतविरोधी कारवायांमध्येही गुंतल्याचे अनेक पुरावे सापडले आहेत.सदर बाब राष्ट्राच्या एकात्मता व अखंडतेला धोका निर्माण करणारी असून या घुसखोरीवर आळा घालण्यासाठी सरकारने कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे.सरकारने घुसखोरांविषयी आक्रमक भूमिका घेतली तरच आपल्या देशात घुसखोरी करण्याचा विचारही घुसखोरांच्या मनात येणार नाही
केवळ त्यांना अटक करून या घुसखोरीवर नियंत्रण मिळवणे,शक्य होणार नाही.त्यांना कागदपत्रे उपलब्ध करून देणाऱ्या टोळ्यांचा समूळ नायनाट व देशाच्या सीमावर्ती भागातील सुरक्षा व्यवस्थेबाबत केंद्र सरकारने कठोर पावले उचलणे,अशा दोन स्तरावर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

