दीपक मोहिते,
पालघर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी गणेश नाईक,
मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत,
भाजपचे विद्यमान
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मंत्रीमंडळात वर्णी लागल्यामुळे त्यांना ” एक व्यक्ती,एक पद,” भाजपच्या नियमावलीनुसार अध्यक्षपद सोडावे लागणार आहे.त्यामुळे या पदावर देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे तसेच विश्वासू सहकारी असलेल्या रविंद्र चव्हाण वर्णी लागणार आहे.यासंदर्भात एक ते दोन दिवसात त्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांनी गेल्या दहा वर्षात पक्षवाढीसाठी केलेले प्रयत्न नजरेत भरणारे होते. पालघर व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कार्यरत असताना या दोन्ही जिल्ह्यातील लोकसभा व विधानसभा जागा जिंकण्यासाठी भरीव योगदान दिले.या दोन्ही जिल्ह्यावर आजच्या घडीला निर्विवाद वर्चस्व निर्माण झाले आहे.भाजपच्या या यशाचे श्रेय रविंद्र चव्हाण यांच्याकडे जाते.त्यांनी केलेली पक्षाची बांधणी व झालेल्या रणनितीमुळे पालघर जिल्ह्यातील आ.हितेंद्र ठाकूर यांच्या तीन दशकाच्या साम्राज्याला सुरुंग लागला.तर या जिल्ह्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्चस्वही मोडीत निघाले.भाजपचे विलास तरे व राजेंद्र गावित यांना एकनाथ शिंदे गटात पाठवून निवडून आणण्याच्या भाजपच्या रणनितीमध्ये चव्हाण यांचे मोठे योगदान होते.तसेच सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात लोकसभेच्या दोन व विधानसभेच्या सर्व जागा त्यांनी निवडून आणल्या.त्यामुळे प्रदेशाध्यक्षपद त्यांच्याकडे सोपावण्याचा निर्णय केंद्रीय नेत्यांनी घेतला आहे.पालकमंत्री चव्हाण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात.फडणवीस यांनी गिरीश महाजन व रविंद्र चव्हाण यांच्यावर आजवर ज्या जबाबदाऱ्या सोपवल्या,त्यांनी त्या व्यवस्थितपणे पार पाडल्यामुळे या दोघांची ओळख भाजपचे ” संकटमोचक,” अशी तयार झाली आहे.त्याचीच पोचपावती चव्हाण यांना मिळाली आहे.त्यांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागल्यामुळे पालघर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर विरोधक असलेले विद्यमान वनमंत्री गणेश नाईक यांची वर्णी लावण्याच्या तयारीत आहेत.तसेच पालघर जिल्ह्यात विशेष करून वसई व नालासोपारा मतदारसंघात त्यांचा आगरी समाज हा मोठ्या संख्येने राहतो.हा समाज आ.ठाकूर प्रणित बहुजन विकास आघाडीसोबत आहे,त्या समाजाला आपलेसे करण्यात गणेश नाईक योग्य भूमिका पार पाडतील,अशी खात्री असल्यामुळे पालघरचे पालकमंत्री म्हणून त्यांचे नाव जाहीर होण्याची शक्यता आहे.गणेश नाईक यांचा वसई तालुक्यातील जूचंद्र या आगरी बहुल गावात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमात अनेक आगरी तरुणांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात येणार होता,पण माजी पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग यांच्या निधनामुळे देशात सात दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात येत असल्यामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.कदाचित हा कार्यक्रम पुढच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.गणेश नाईक यांनी यापूर्वी युती सरकारच्या काळात तत्कालीन ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी काम केले आहे.त्यामुळे येथील राजकीय परिस्थितीची त्यांना चांगली जाण आहे.त्यांचे या तालुक्यातील विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चांगले संबंध आहेत,त्याचा फायदा भाजपला पक्षवाढीसाठी होऊ शकतो.तसेच वसई – विरार शहर महानगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजप,भावी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण,भावी पालकमंत्री गणेश नाईक व राज्यमंत्रीपदाचा दर्जा असणारे विवेक पंडित,आ.राजन नाईक,आ.स्नेहा दुबे – पंडित, आ.विलास तरे,या सहा जणांचा संघ रणागणात उतरवेल.त्यामुळे आ. हितेंद्र ठाकूर यांना आपल्या माजी नगरसेवकांवर डोळ्यात तेल टाकून पहारा द्यावा लागणार आहे.नालासोपारा मतदारसंघात अनेक माजी नगरसेवक व माजी नगरसेविका भाजपच्या गळाला लागण्याची शक्यता आहे.येथील सर्व नगरसेवक व नगरसेविका आपला नेता कशी भूमिका घेतो,याकडे नजर लावून बसले आहेत. त्यामुळे पुढील महिन्यात भाजप मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत असल्याचे विश्वसनिय सूत्रांकडून माहिती मिळत आहे.

