दीपक मोहिते,
आगामी वर्ष चांगलं जावो,अशी अपॆक्षा करूया…
नववर्षदिन अवघ्या तीन दिवसावर आला असून देशवासीय तो साजरा करण्यासाठी सज्ज झाले आहेत.गेल्या वर्षभरातील कटू आठवणीना मूठमाती देत देशवासीय नव्या वर्षाचे स्वागत करतील.नवी आकांक्षा व अपेक्षा उराशी बाळगत नववर्षाला सामोरे जात आहेत.
सर्वप्रथम गतवर्ष सर्वसामान्य जनतेला कसे गेले,याविषयी आढावा घेऊया.हे वर्ष फारसे उत्साहवर्धक नव्हते.या वर्षात आर्थिक आघाडीवर फारशा घडामोडी घडल्या नाहीत. महागाई ” जैसे थे,” स्थितीत राहिली.अनेक जीवनावश्यक वस्तूच्या जीएसटीमध्ये वाढ झाली.या वर्षात राज्य सरकारने सार्वजनिक पैश्याची बेफाम उधळपट्टी केली.त्याचा राज्याच्या विकासकामांवर परिणाम झाला.राज्यावर कर्जाचा बोझा प्रचंड प्रमाणात वाढत गेला.ही वाढ सुमारे २३ % इतकी होती.बाजारातील वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे पार मोडले.या काळात महागाईचा दर ६.२५ ते ७.०० % च्या दरम्यान स्थिर राहीला.केंद्रीय स्तरावर रेल्वे,राष्ट्रीय महामार्ग,शहरी विकास,इ.पायाभूत सुविधा प्रकल्पात प्रचंड आर्थिक गुंतवणूक झाली.ही समाधानाची बाब असली तरी,राज्यात मात्र पायाभूत सुविधा उपलब्ध करणारे प्रकल्प कार्यान्वित होऊ शकले नाहीत.या काळात शिंदे सरकारने लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून अनेक योजनांवर सार्वजनिक पैशाची उधळपट्टी करण्यात समाधान मानले.त्यामुळे राज्याच्या विकासाची गती मंदावली.राज्य विकासाच्या बाबतीत खालच्या क्रमांकावर गेले.राज्याच्या तिजोरीत निर्माण झालेला खडखडाट संपवण्यासाठी सरकार आता विविध उपाययोजना करू पाहत आहे.अगदी अलीकडे सरकारने महसूल वाढीसाठी मद्यधोरणात बदल करण्याचा धोकादायक निर्णय घेतला.१९७२ पासून बंद असलेले दारूचे परवाने,सरकार आता मुक्तहस्ते वितरीत करणार आहे.महसूल वाढीसाठी सरकार अशाप्रकारची उपाययोजना करू पाहत आहे.पण सरकारचे हे धोरण तरुण पिढीला उध्वस्त करणारी ठरेल,अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे.दुसरीकडे राज्याच्या अर्थकारणात मोठे योगदान असणाऱ्या कृषी क्षेत्रातही फारसे काही महत्वाचे काही घडू शकले नाही.उत्पादित कृषीमालाला योग्य हमीभाव दिला गेला नाही.राज्यात सध्या खरीप हंगाम संपून रब्बी पिकांचा हंगाम सुरू झाला आहे.पण राज्याच्या अनेक जिल्ह्यात अद्याप खरेदी केंद्रे सुरू झालेली नाहीत.त्यामुळे शेतकरीवर्ग चिंतेत सापडला आहे.रोजगार व उद्योग क्षेत्रातही राज्य सरकारकडून भरीव कामगिरी होऊ शकली नाही.रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या वारेमाप घोषणा करण्यात आल्या.परदेशात जाऊन अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांशी करारनामे केल्याचे भासवण्यात आले.पण प्रत्यक्षात वर्षभरात एकही उद्योग राज्यात आल्याचे पाहायला मिळाले नाही.उलट राज्यातील अनेक उद्योगधंदे व केंद्रीय कार्यालये,शेजारच्या गुजरात राज्यात स्थलांतरित होत गेली.त्यामुळे मुंबईला केंद्रशासित करण्याचे प्रयत्न होत असल्याचा संशय बळावत गेला.ही स्थिती लक्षात घेता गतवर्षं हे ” ज्यादा गम,खुशी कम,” असंच गेल्याचे दिसून आले आहे.येणारे वर्ष,हे राज्याला सुख-समाधानाचे तसेच शेतकरी,बेरोजगार तरुणांना दिलासा देणारे असेल,अशी अपेक्षा करूया…

