दीपक मोहिते,
” वास्तव,”
वसई-विरारमधील विकासकामांना प्रत्यक्ष मिळालेल्या निधीपेक्षा अधिक “आमदार निधी,” खर्च,
पालघर जिल्ह्यातील अन्य आमदारांच्या तुलनेत आमदार हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांनी प्रत्यक्ष रकमेपेक्षा अधिक ” आमदार निधी,” वसई-विरार शहरांतील विकासकामांवर खर्च केला आहे,असा खुलासा बहुजन विकास आघाडीतर्फे करण्यात आला आहे.
आ.क्षितिज ठाकूर यांनी सन २०१९ – २० ते सन २०२४ – २५ या पाच वर्षांच्या कालावधीत १७ कोटी ८५ लाख ३० हजार ९०रु.चा निधी नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील विकासकामांसाठी वापरात आणला आहे,अशी माहिती देत बहुजन विकास आघाडीने विरोधकांना तोंडघशी पाडले आहे.
आमदार हितेंद्र ठाकूर व क्षितिज ठाकूर यांनी ” आमदार निधी,” खर्च न केल्याने तो तसाच पडून राहतो किंवा परत जातो,असा अपप्रचार समाजमाध्यमांतून विरोधी पक्षांनी सुरू केला आहे. त्यासाठी एका वर्तमानपत्राची जुनी कात्रणे प्रसिद्धीस देण्यात येत आहेत.बहुजन विकास आघाडीने विरोधकांचे हे आरोप फेटाळून लावले आहेत.किंबहुना जिल्हा नियोजन समितीने ” आमदार स्थानिक विकास कार्यक्रम,” अंतर्गत शिफारस केलेल्या कामांच्या प्रशासकीय मंजुरीबाबतचे १५ ऑक्टो.२०२४ चे जिल्ह्याधिकारी यांचे पत्रच सादर करून विरोधकांचे सारे आरोप मोडीत काढले आहेत.त्यामुळे विरोधकांची आता बोलती बंद झाली आहे.
पाच वर्षांच्या १०३ कामांसाठी १७ कोटी ५० लाख इतका “आमदार निधी,” क्षितिज ठाकूर यांना प्राप्त झाला होता. प्रत्यक्षात त्यांनी त्याहून अधिक निधी म्हणजेच १७ कोटी ८५ लाख ३० हजार ९० रु.चा निधी नालासोपारा विधानसभा क्षेत्रासाठी खर्च केला आहे. विशेष म्हणजेे यामध्ये पुढील वर्षाच्या दायित्व रकमेचाही समावेश आहे.
कोविड काळात (२०२१-२२) संपूर्ण आमदार निधी बाल रुग्णालयाला दिला होता.
कोविड काळात आपत्तीजन्य परिस्थिती लक्षात घेता आ. क्षितिज ठाकूर यांनी आपला १ कोटीचा आमदार निधी हा वसई विरार शहर महानगरपालिकेला दिला होता.त्यातून बोळींज येथे पालिकेच्या कोव्हीड १९ लहान मुलांच्या रुग्णालयाला १४ नग एन.आय.सी.यु व्हेंटिलेटर्स खरेदी करण्यात आले.
ग्रामीण भाग तसेच ग्रामपंचायतींना निधीची उणीव असते,हे लक्षात घेऊन ग्रामीण भागांसाठी विविध विकासकामांची शिफारस आ. क्षितिज ठाकूर यांनी केली होती.त्यासाठी निधी मंजूर होऊन नालासोपाऱ्यात विविध ठिकाणी कामे पूर्ण झाली आहेत.या कामांमध्ये गटार पाइपलाइन उभारणे,नाला बांधणे,रस्ता खडीकरण करणे,उद्याने विकसित करणे,समाजमंदिरे उभारणे इ.कामांचा समावेश आहे. तर २०२४-२५ वर्षासाठी मंजूर झालेल्या कामांमध्ये अशा विविध विकास कामांचा समावेश करण्यात आला आहे.
विरार येथील रानळे तलावाजवळ समाजमंदिर उभारणे,नालासोपाऱ्यातील आचोळे येथे स्मशानभूमी बांधणे,उर्दू शाळेची दुरुस्ती करणे,नालासोपारा पश्चिम येथे खुला रंगमंच उभारणे, ग्रामपंचायत खार्डी-डोलिव भागात ४४ लाख रु.खर्च करून काँक्रीटचे रस्ते बांधणे,तसेच विरार पूर्व येथील संतनगर येथे मैदानाचा विकास,वसंतनगरी येथील मैदानाचा विकास तसेच कोशिंबेमधील तळ्याचा पाडा येथे संरक्षक भिंतीसह व्यायाम शाळा उभारणार आहे.तसेच नालासोपारा येथील नागेला तलावाचे सुशोभीकरण, बिरसामुंडा पाडा, भंडारआळीमध्ये समाजमंदिर उभारले तसेच शहराच्या विविध भागात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्रे उभारण्यात येणार असून
त्याचा फायदा ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे.

